Ram Mandir | ‘दंगलीत एका कार्यकर्त्याचा खून झाला, मी दैव कृपेने वाचलो’, गुलाबराव पाटील यांच्या चित्तथरारक आठवणी

| Updated on: Jan 18, 2024 | 6:30 PM

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. या आंदोलनानंतर आपल्या गावात उसळलेल्या दंगलीत एका कार्यकर्त्यांचा खून करण्यात आला होता. पण त्यावेळी सुदैवाने बचावलो होतो, अशी चित्तथरारक आठवण गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितली.

Ram Mandir | दंगलीत एका कार्यकर्त्याचा खून झाला, मी दैव कृपेने वाचलो, गुलाबराव पाटील यांच्या चित्तथरारक आठवणी
Follow us on

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 18 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारलं जावं यासाठी अनेक वर्ष आंदोलने झाली. त्यानंतर आता प्रत्यक्षात आंदोलकांचं स्वप्न साकार होत आहे. या मंदिरासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी या मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. “राम मंदिर उभारणीसाठीचे आंदोलन सुरू असताना आमच्या पाळधी गावात उसळलेल्या दंगलीत एका कार्यकर्त्याचा खून झाला होता. मी दैव कृपेने वाचलो होतो”, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी दिली. “त्यावेळी काही दिवस भूमिगत राहिलो. आम्ही तिघे सख्खे भाऊ जेलमध्ये गेलो होतो”, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

“भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिर निर्माणासाठीची काढलेली रथ यात्रा ही आमच्या गावावरून गेली होती. त्यावेळी विटा जमा करणे, वर्गणी जमा करणे या कार्यक्रमांमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता सहभागी झाला होता. त्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या विचारांचे कार्यकर्ते एकत्र काम करत होते. त्यावेळी निवडणूक झाली तेव्हा त्या निवडणुकीत तब्बल 82 खासदार हे भाजपचे देशात निवडून आले होते. त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात निश्चितच फरक आहे. मात्र त्या काळात राम मंदिर उभारण्यासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनाची फलश्रुती आज होत असून याचा मोठा आनंद आहे”, अशी भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

‘बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याच्या प्रसंगावेळी…’

“शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते म्हणून नाही, तर हिंदुत्व विचारसरणीचे कार्यकर्ते हिंदुत्वाच्या नावाने राम मंदिर उभारणीसाठी त्यावेळी सर्व एकत्र आले होते. बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याच्या प्रसंगावेळी बाळासाहेबांचे आदेश आले. त्यानंतर भाजप असतील, शिवसेना असतील, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असे हिंदुत्ववादी सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते रामलल्लाच्या मंदिर उभारणीसाठीच्या आंदोलनमध्ये उतरले”, असं गुलाबरावांनी सांगितलं.

‘आम्ही तिघे भाऊ वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील जेलमध्ये’

“बाबरी मशीद पाडल्यानंतर तसेच लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाल्यामुळे सर्वत्र बंद पाळण्यात आला होता. आमच्या गावात सुद्धा बंद पाळण्यात आला होता. याच दरम्यान पाळधी गावामध्ये दंगल उसळली होती आणि या दंगलीत आमच्या गावातील एका कार्यकर्त्याचा खून झाला होता. आम्ही तिघे भाऊ वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील जेलमध्ये होतो. आमच्या कुटुंबातल्या महिलांना माहेरी पाठवलं होतं. तडीपारची कारवाई व्हावी म्हणून आम्हाला नोटीस सुद्धा बजावण्यात आल्या होत्या”, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

“राम मंदिर उभारण्यासाठी आंदोलनांमध्ये किंवा वेगवेगळी कामगिरी बजावताना अनेक कारसेवकांचे प्राण गेले. त्यांचे मृतदेह शरयू नदीमध्ये वाहिले गेले. मृत्यू झालेले रामभक्त असतील, कार्यकर्ते असतील, कार सेवक असतील त्यांना रामलल्लाची होत असलेली प्रतिष्ठापना हीच खरी श्रद्धांजली आहे”, असं गुलाबराव म्हणाले.

गुलाबरावांनी ठाकरे गटाला लगावला टोला

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले हे आम्ही मानतच नाही. ते शरीराने गेले आहेत. मात्र त्यांचे विचार हे जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत त्यांचे विचार हे कायम असतील. याच बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही चालत आहोत. कोणी म्हणतं की शिवसेनेमध्ये दोन तुकडे पडले. मात्र आम्ही ते मानत नाही. बाळासाहेबांची विचारांची शिवसेना ही आमची शिवसेना आहे. त्यांचा भगवा झेंडा घेऊनच आम्ही पुढे चालत आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्यासाठी पहिला आदर्श स्थान हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत, आनंद दिघे आहेत आणि भगवा झेंडा आहे. काही लोकांनी भगवे झेंडे सोडले. ते आता उद्या गाडीलाही झेंडे लावणार नाहीत”, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.

“आता सध्या तरी अयोध्या येथे जाता येणार नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आहेत की प्रत्येक गावागावात दिवाळी साजरी झाली पाहिजे. त्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यात नियोजन सुरू आहे तयारी सुरू आहे. मात्र हा सर्व सोहळा संपल्यानंतर जळगाव ग्रामीणमधील नागरिकांना तसेच कार्यकर्त्यांना एका स्पेशल रेल्वेने आयोध्या येथे दर्शनासाठी घेऊन जाण्याचा मानस आहे”, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं