महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध कामांबाबत विस्तृत माहिती दिली. एकनाथ खडसे यांनी जलसिंचनासाठी खूप मोठं काम केलं आहे. त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढत राज्यभरात अनेक धरण, बॅरेज बांधले. खडसे यांनी या मुलाखतीत त्यांनी केलेली कामे, ती कितपत यशस्वी झाली आणि जी कामे अर्धवट राहिली याबाबत सविस्तर भूमिका मांडली. एकनाथ खडसे यांनी नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्पावरही भूमिका मांडली.
राज्य सरकारने 10 टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात टाकण्याबाबतचा निर्णय घेतला. तसेच त्यासाठी निधीची देखील घोषणा केली. पण उत्तर महाराष्ट्रात राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात असलं तरी काही सामाजिक संघटना, राजकीय नेते 10 टीएमसी पेक्षा जास्त पाण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी अनेक संघटना आंदोलनही करत आहेत. आंदोलकांची ही मागणी रास्त असल्याचं मत खडसेंनी व्यक्त केलं. 10 टीएमसी पाण्याने काहीच होणार नाही, असं स्पष्ट मत खडसेंनी व्यक्त केलं. त्यामुळे एकनाथ खडसे यांना या प्रकल्पासाठी आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खडसेंनी परखडपणे भूमिका स्पष्ट केली.
“पाण्यासाठी कुणाचाही प्रामाणिक प्रयत्न असेल, मग तो कुणाचाही असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, संघटनेचा असेल, कोणत्याही विचाराचा माणूस असेल, पण पाण्यासाठी संघर्ष करत असेल तर मी त्याच्या पाठिशी उभा आहे. त्यांच्यासोबत मी केव्हाही संघर्ष करायला तयार आहे. पाणी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाणी हे जीवन आहे आणि माझं जीवन पाण्यासाठी थेंब थेंब तुटतं. तसं मी पाठिशी राहील. त्यासाठी मी रस्त्यावर उतरायला, भांडायला काहीच अडचण नाही. नारपारचं पाणी हे आमच्या हक्काचं पाणी आहे. ते आम्हाला मिळालंच पाहिजे. त्यासाठी लढायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
“नार-पार प्रकल्प हा फार मोठा प्रकल्प आहे. नार-पार प्रकल्पाची कल्पना ही फार जुनी आहे. पण नव्याने ज्यावेळेस युती सरकार आलं त्यावेळेस मी पाठबंधार मंत्री झालो. त्यावेळेस आम्ही गोदावरी सिंचन महामंडळाची स्थापना केली. इकडे तापी सिंचन महामंडळ स्थापन केलं. त्या कालखंडात तापीच्या माध्यमातून मुहूर्तमेढ रुढावी असा आमचा प्रयत्न होता”, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
“नार-पारचा विषय असा विषय होता की, तिथे सहा नद्या आहेत. त्या सहा नद्यांवर धरणं बांधून त्यातलं उरलेलं पाणी चणकापूर धरणात आणून, चणकापूर धरण हे त्या धरणाचं मूळ आहे. तिथून ते पाणी गिरणा नदीत टाकायचं. तिथे काही नद्या होत्या, अंबिका, दमनगंगा अशा स्वरुपाच्या आजही सहा नद्या आहेत. या सहा नद्यांचं पाणी आजही अरबी समुद्रात जावून मिळतं. अरबी समुद्राला जावून मिळणारं पाणी अडवलं पाहिजे अशी सर्वांची कल्पना होती”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
“दमनगंगा खोरे आणि अंबिका खोरे, अशा सहाही नद्यांच्या ठिकाणी धरणं बांधण्यासाठी त्या भागात ज्या टेकड्या वगैरे आहेत, त्यामुळे ते काम खर्चिक आहे, पण पाणी साठवू शकतो अशी स्थिती आहे, असं सर्वेक्षण आमच्यासमोर आलं होतं. नंतर ते पाणी गिरणा धरणात टाकून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा एवढ्या तालुक्यांना त्याचा लाभ व्हावा, आधी त्याचा लाभ गिरणा धरणाला होता, गिरणा धरण हे 50 टक्के डिपेन्डिबल आहे. हे धरण फक्त 50 टक्के भरेल असं आहे, ती 50 टक्के तूट आहे. ती तूट भरुन काढण्यासाठी नार-पार प्रकल्पाचं पाणी त्यात टाकलं पाहिजे. यामुळे ते धरण शंभर टक्के भरेल. त्यामुळे जळगाव जिल्हातील सर्व तालुक्यांना पाणी मिळेल”, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
“जळगावातील सहा ते सात तालुके बागायत होतील. खरंतर ते बागायतदार होते. पण गिरणा धरणावर अनेक धरणं जसं की, चणकापूर सारखी धरणे बांधल्यामुळे खान्देशाला पाणी मिळत नाही. पण ठिक आहे, नार-पार प्रकल्पाचं पाणी आल्याने गिरणा धरणात शंभर टक्के पाणी होईल आणि खान्देशवासीयांना त्याचा फार मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.