जळगाव | 25 सप्टेंबर 2023 : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच लोकसभेचे तिकीट कापलं जाणार असणार असल्याची चर्चा रंगायला लागली आहे. यावर खासदार उन्मेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उन्मेष पाटील हे नुकतेच दहीहंडीच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आले होते. रात्री दहा वाजेनंतर डीजेवर बंदी असताना त्यांनी पोलिसांना गर्दीचा धाक दाखवत नियमांचं उल्लंघन केलं होतं. हे प्रकरण प्रचंड तापलं होतं. त्यानंतर आता पुन्हा उन्मेष पाटील चर्चेत आले आहेत. त्यांचं आता तिकीटच कापलं जाणार असल्याची चर्चा आहे.
खासदारकीच्या काळात मी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली. देशातल्या टॉप टेन खासदारांमध्ये मी सुध्दा होतो. आमचा पक्ष प्रचंड हुशार आणि चाणाक्ष आहे. त्यामुळे माझी कामगिरी लक्षात घेवून पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मी खासदार म्हणून जी जबाबदारी पार पडली, त्यानंतरही पक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य राहील. त्या निर्णयाशी मी बांधिल राहिल, असे खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटलं.
उन्मेष पाटील यांनी एकप्रकारे उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबतच्या पक्षाच्या निर्णयावर अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास उन्मेष पाटील हे भाजपसोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याचीही चर्चा आहे. यावर खासदार उन्मेष पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पक्ष बदलण्याचा निर्णय मुळीच नाही. कुणीतरी काहीतर वावड्या उठवित आहे. झारीतले शुक्राचार्य प्रकाराला वेगळ रुप देण्याचा प्रयत्न करत असतील, पण मी भाजपचा एक प्रामाणिक सैनिक म्हणून काम करतोय आणि करत राहिल, अशी भूमिका उन्मेष पाटील यांनी मांडली.
उज्ज्वल निकम यांच्याशी पारिवारिक संबंध आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. ते सुद्धा लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांची भूमिका मांडतील, असं उन्मेश पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता उज्ज्वल निकम काय भूमिका मांडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप उज्ज्वल निकम यांना खरंच लोकसभेचं तिकीट देणार का? खरंच तिकीट दिल्यानंतर काय-काय घडू शकतं? हे आगामी काळात बघायला मिळण्याची शक्यता आहे.