साने गुरुजी यांच्या अमळनेरमध्ये नथुराम गोडसे याचा जयघोष, धक्कादायक प्रकार

| Updated on: Sep 30, 2023 | 11:53 PM

जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहर हे साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं. पण साने गुरुजींच्या कर्मभूतीच नथुराम गोडसेचा प्रतिमा नाचवत त्याचा जयघोष करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

साने गुरुजी यांच्या अमळनेरमध्ये नथुराम गोडसे याचा जयघोष, धक्कादायक प्रकार
Follow us on

जळगाव | 30 सप्टेंबर 2023 : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत महात्मा गांधी यांच्या हत्येतील दोषी नथुराम गोडसे याच्यासह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा नाचवित जयघोष करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नथुराम गोडसे याच्या प्रतिमेसह शिवप्रतिष्ठान हिदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचीदेखील प्रतिमा नाचवत जयघोष करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे जळगाव जिल्ह्याचा संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर शहरात गुरुवारी (28 सप्टेंबर) सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शहराच्या पान खिडकी परिसरातील जय बजरंग गणेश मंडळाची मिरवणूक निघाली. शहराच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक जात असताना मिरवणुकीत काही कार्यकर्ते आले. यावेळी संबंधित प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

या कार्यकर्त्यांनी हातात महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या नथुराम गोडसे याची प्रतिमा धरलेल्या होत्या. तर एका बाजूला गोडसे तर दुसऱ्या बाजुला संभाजी भिडे याची प्रतिमा होती. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या देखील प्रतिमा नाचविण्यात आल्या.

ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि स्वातंत्र्य सेनानी साने गुरूजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात हा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, डीजेच्या तालावर कार्यकर्ते नथुराम आणि भिडे यांच्या प्रतिमा नाचवित होते त्यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.