‘माझ्यावर 130 धाडीवर टाकल्या, माझ्या 6 वर्षाच्या नातीला….,’ अनिल देशमुख यांचा नेमका दावा काय?

| Updated on: Sep 05, 2023 | 4:20 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज भाजपवर घणाघात केला. यावेळी त्यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला. तसेच आपल्याला ईडीचा धाक दाखवून कशाप्रकारे भाजपसोबत जाण्यासाठी दबाव निर्माण करण्यात आला होता, याबाबत अनिल देशमुख यांनी माहिती दिली.

माझ्यावर 130 धाडीवर टाकल्या, माझ्या 6 वर्षाच्या नातीला...., अनिल देशमुख यांचा नेमका दावा काय?
Follow us on

जळगाव | 5 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जळगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. या कार्यक्रमात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्ताधारी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. भाजपने माझ्यावर 130 धाडी टाकल्या पण मी घाबरलो नाही, असं अनिल देशमुख म्हणाले. आपल्या पक्षातील वरिष्ठ सहकारी हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले, अशी टीका त्यांनी केली. यावेळी अनिल देशमुख यांनी आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी माहिती दिली.

“महाराष्ट्रात गेल्या एक-दीड वर्षापासून काय चाललंय ते आपण पाहतोय. एक वर्षापूर्वी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. एक-सव्वा वर्षापूर्वी भाजपच्या लक्षात आलं की, आपल्या स्वत:च्या ताकदीवर सत्ता स्थापन करता येणार नाही. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणता येणार नाही, हे जेव्हा भाजपच्या लक्षात आलं तेव्हापासून त्यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. त्यांनी आधी शिवसेनेचे 35 ते 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फोडले”, असं अनिल देशमुख म्हणाले.

‘शिवसेनेच्या आमदारांना 50 खोके दिले’

“शिवसेनेचे आमदार ते कशामुळे फुटले, त्यांना कशाचं आमिष दाखवलं, काय दिलं? 50 खोके एकदम ओके. 50 खोके घेऊन हे आमदार भाजप सरकारमध्ये सामील झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या लक्षात आलं की हे आमदार सामील झाले तरी आपल्याला जसा फायदा व्हायला पाहिजे तसा फायदा न होता, याउलट तोटा झाला, हे जेव्हा भाजपच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी दुसरा प्रयोग केला”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.

‘राष्ट्रवादीचे नेते ईडीच्या धाकाने गेले’

“आपल्या पक्षाचे काही ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत गेले. शिवसेनेचे आमदार 50 खोक्यांच्या आमिषामध्ये गेले. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कशासाठी त्यांच्यासोबत गेले? तर हे सर्व ईडीच्या धाकाने तिकडे गेले”, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली.

‘त्यांनी मलाही ईडीचा धाक दाखवला’

“ईडीचा धाक तर त्यांनी मलाही दाखवला होता. आमच्यासोबत समझौता करा, आमच्यासोबत या, असं म्हणाले. पण मी त्यांना सांगितलं की, मी तुमच्यासोबत आयुष्यात कधी समझौता करणार नाही. त्यामुळे माझ्यावर मुंबईच्या पोलीस आयुक्ताला सांगून 100 कोटींचा आरोप करायला लावला”, असं अनिल देशमुख म्हणाले.

‘मला दीड वर्ष जेलमध्ये ठेवलं’

“माझ्यावर ईडी, सीबीआय लावली, चौकशी झाली. पण कोर्टात केस गेली तेव्हा आरोप करणाऱ्यांना बोलावलं तेव्हा पोलीस आयुक्त आला नाही. शेवटी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह याने आपण केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले, असं लिखित स्वरुपात जबाब दिला. या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. पण तरीही मला दीड वर्ष जेलमध्ये ठेवलं”, असा आरोप अनिल देशमुखांनी केला.

‘माझ्याकडे समझौता करायला आले तेव्हा…’

“मला 14 महिने जेलमध्ये ठेवलं. माझ्यावर 100 कोटींचा आरोप झाला. पण ईडीने चार्जशीट दाखल केली त्यामध्ये 1 कोटी 71 लाखांचा आरोप केला. 100 कोटीवरुन 1 कोटी 71 लाखांवर आले. मला 14 महिने जेलमध्ये ठेवलं. माझ्याकडे समझौता करायला आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की, अनिल देशमुख आयुष्यभर जेलमध्ये राहील. पण तुमच्यासोबत समझौता करणार नाही. अशा पद्धतीने मी शरद पवार यांच्या पाठीमागे उभा राहीलो. मी आजसुद्धा शरद पवार यांच्या पाठीशी आहे”, असं देशमुख म्हणाले.

‘माझ्या सहा वर्षाच्या नातीची सुद्धा चौकशी’

“माझ्या सहा वर्षाच्या नातीची सुद्धा चौकशी केली. माझ्या नातीला कॅडबेरीचं आमिष दाखवून अर्धा तास चौकशी केली. माझ्यावर 130 धाडी टाकल्या. पण घाबरलो नाही. मी सांगितलं, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि शेवटपर्यंत शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. अशाप्रकारे आपल्या इतर साथीदारांसारखं मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही”, असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला.