‘हिवाळी अधिवेशनाआधीच गोड बातमी…’, काका-पुतणे एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा

| Updated on: Nov 15, 2023 | 8:04 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये सातत्याने भेटीगाठी झाल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांंमध्ये भेट घडून आली आहे. या भेटीगाठींवर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे या भेटीगाठींवर राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

हिवाळी अधिवेशनाआधीच गोड बातमी..., काका-पुतणे एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
ajit pawar and sharad pawar
Follow us on

मनेश मसोळे, Tv9 मराठी, जळगाव | 15 नोव्हेंबर 2023 : “विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी गोड बातमी मिळणार आहे”, असं सूचक वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. “शरद पवार अजित पवार दिवाळीनिमित्त कुटुंब एकत्र आले आहेत. काही दिवसात गोड बातमी मिळू शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे”, असं अनिल पाटील म्हणाले आहेत. “गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षात असलेल्या आमदारांना पश्चाताप झालाय. आम्ही या बाजूला का राहिलो? असा पश्चात्ताप त्यांना होतोय. त्यांच्या बोलण्याहून मला अंदाज येतोय”, असा दावा अनिल पाटील यांनी केलाय.

अनिल पाटील नेमकं काय म्हणाले?

“काही विरोधात बसलेले आमदार सातत्याने पश्चात्ताप करत आहेत, आम्ही कुठून या बाजूला राहिलेलो आहोत. मग ते कोणत्याही पक्षाचे असू शकतात. म्हणून अधिवेशनाआधी किंवा अधिवेशन संपल्यानंतर चांगली बातमी कानावर येऊ शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे”, असं अनिल पाटील म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत यांना राजकीय मलेरिया झालाय. त्यांना अजित पवारांच्या कुठल्याही भेटीवर असं बोलण्याची सवय आहे”, असं अनिल पाटील म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वरिष्ठ पातळीवर अनेक हालचाली घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांची गेल्या आठवड्यात दिवाळी निमित्त भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला गेले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग निवासस्थानी देखील अजित पवारांनी हजेरी लावली आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अजित पवारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर अजित पवारांच्या निवास्थानी आज शरद पवार गेले होते. भाऊबीजच्या निमित्ताने शरद पवार अजित पवरांच्या निवासस्थानी गेले होते.

या घडामोडींवरुन वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवार सत्तेत सहभागी होणार की, अजित पवार पुन्हा माघारी येणार? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. दोन्ही नेत्यांची कौटुंबिक भेट घडून आली आहे. या घडामोडींमागे कौटुंबिक कारण मानलं जात आहे. कारण पवार कुटुंबिय दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येतात. पण गेल्या काही दिवसांमधील राजकीय घडामोडी पाहता पवार कुटुंबिय एकत्र येणार का? याबाबत साशंकता होती. पण पवार कुटुंबियांनी एकत्र येत आम्ही कौटुंबिकपणे एक आहोत हे सिद्ध केलं आहे.