‘मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे’, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शरद पवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी पवारांना थेट धृतराष्ट्राची उपमा देवून टाकली. त्यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे, ते म्हणजे राज्यभरातील सूनांचा अपमान झाल्यासारखं असल्याचं मला वाटतं आहे. कुठल्याही सुनेला लेकीप्रमाणे वागावं, सुनेला लेकीप्रमाणे दर्जा द्यावा, असं शरद पवार यांनी म्हणणं अपेक्षित आहे”, असं मत अनिल पाटील यांनी मांडलं
“सूना ह्या बाहेरच्या असतात असं सांगणं कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. महिलांना प्राधान्य देणाऱ्या शरद पवार यांनी असं वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं. केवळ पुत्र प्रेम राहील म्हणून आपल्या सुनेला तिरस्काराच्या वागणुकीचं वक्तव्य येत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे शरद पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन या राज्यात कोणीही करू शकत नाही”, अशी टीका अनिल पाटील यांनी केली.
“शरद पवार यांनी त्यांची चूक कबूल केली असेल. शरद पवार गटात जी मंडळी असेल ती मंडळी आमदार एकनाथ खडसेंना आवडत नसेल. त्यामुळे खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. खडसे यांना विधान परिषदेत उमेदवारी द्यावी इथपर्यंत शरद पवार यांचा निर्णय योग्य होता. तसेच खडसे यांना विधान परिषदेत निवडून आणण्याचं कर्तव्य अजित पवार यांनी पार पडलेलं आहे. त्यामुळे खडसे आता महायुती येत असतील तर आम्हाला आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर दिली.
“मतदान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी नागरिकांची भावना आहे. कार्यकर्त्यांनाही तेच वाटत आहे. त्यामुळे उमेदवार कोणताही पक्षाचा असला तरी त्याला मदत करण म्हणजे आपल्याच नेत्याला मत करणं आहे. शिंदे गट असेल, राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, आपल्याच नेत्याला मत देणं जरुरीचं आहे, असा विश्वास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. कार्यकर्त्यांचा आपआपल्या नेत्यावर विश्वास आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं जाईल. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील”, असा विश्वास मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.