अजित पवार गटात भूकंप येणार असल्याचा दावा, ‘हा’ बडा मंत्री थेट भाजपात जाणार?

| Updated on: Jun 28, 2024 | 5:49 PM

शरद पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने अजित पवार गटातील सध्याच्या एका विद्यमान मंत्र्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार गटातील एक मंत्री भाजपात जाणार असल्याचा दावा या नेत्याने केला आहे.

अजित पवार गटात भूकंप येणार असल्याचा दावा, हा बडा मंत्री थेट भाजपात जाणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर घडून आलं. हे सत्तांतर ज्याप्रकारे घडून आलं याबाबत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कल्पनादेखील नव्हती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत बंड पुकारतील आणि शिवसेना पक्षात फूट पडेल, अशी कल्पनादेखील सर्वसामान्यांना नव्हती. पण तशी घटना घडली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सत्तांतर घडून आल्यानंतर एक वर्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक भलामोठा गट सत्तेत सहभागी झाला. पुढे अजित पवार यांच्या गटालाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळाली. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. राज्याच्या जनेतेने फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारलं हे मतदानातून स्पष्ट झालं. त्यामुळे आता सत्ताधारी पक्ष विविध माध्यमांतून नागरिकांच्या मनात घर करण्यासाठी विविध योजना आणत आहेत.

विशेष म्हणजे आगामी काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुकादेखील आहेत. या निवडणुकीच्या आधी सत्ताधारी अजित पवार गट महायुतीत राहणार की नाही? याबाबत वेगवेगळी चर्चा सुरु आहे. या चर्चा सुरु असतानाच आता महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्याने अजित पवार गटातील बड्या मंत्र्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. संबंधित मंत्री हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचा दावा या माजी मंत्र्याने केला आहे.

नेमका कुणी आणि काय केला दावा?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी जळगावच्या बैठकीत खळबळजनक वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. डॉ. सतीश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केला आहे. अजित पवार यांना सर्वात आधी कोणी सोडून जाईल तर ते मंत्री अनिल पाटील सोडून जातील, असं वक्तव्य सतीश पाटील यांनी केलं. जळगावात काल राष्ट्रपती शरद पवार गटाची मंथन आणि चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत भाषणात डॉ. सतीश पाटील यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सतीश पाटील नेमकं काय म्हणाले?

मंत्री अनिल पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या घेतलेल्या भेटीचा संदर्भ देत सतीश पाटील यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. “अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे सी. आर.पाटील यांच्याकडून भाजपमध्ये जाण्याची लाईन लावत आहेत”, असा दावा सतीश पाटील यांनी केला. “भाजपचे लोक म्हणतात की अजित दादांना सोडून निवडणूक लढवावी लागेल. त्यानुसर पहिला प्रयोग मंत्री अनिल पाटील करत आहेत. अजित दादांना सोडणारा पहिला कोणी माणूस असेल तर तो अनिल पाटील असेल. भाजपमध्ये आपले थोडे फार संबंध आहेत. त्यानुसार एका मोठ्या नेत्याने अनिल पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती दिली”, असं डॉ. सतीश पाटील यांनी सांगितलं.