महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेत आज अजब प्रकार बघायला मिळाला आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असतानाच अचानक बत्तीगुल झाली. अचानक लाईट गेल्यामुळे मंचावर पूर्णत: अंधार पसरला. पण देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण सुरुचं ठेवलं. ही संपूण घटना कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना लाईट गेल्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलमधील टॉर्च लावले आणि मंचाच्या दिशेला दाखवले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात याबाबत उल्लेख केला. “तुमचे लाईट सुरु झाले. अरे आपला करंटच असा आहे की या लाईटची आवश्यकता नाहीय. डब्ब्यामध्ये आपण बसलो तर हा डबा मोदींच्या डब्याला लागणार आहे. काय सुंदर दृश्य आहे बघा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संबंधित प्रकार हा भुसावळ येथे झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यावेळी भुसावळ येथे भाषण करताना संबंधित प्रकार घडला. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर केली होती. यानंतर आज रक्षा खडसेंच्या प्रचारात मुक्ताईनगरचे आमदार फडणवीस यांच्या सभेला उपस्थित झाल्याने आमदार सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान, जळगावत जैन बांधवांतर्फे विजय रत्न सुंदर जी यांच्या प्रवचनाच्या आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे. या ठिकाणी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. फडणवीस आणि विजय रत्नसुंदर सुरिश्र्वरजी महाराज यांचे अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत. विजय रत्नसुंदर महाराज हे आज जळगाव शहरात असल्याचे समजल्यानंतर फडणवीस यांनी जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर विजय रत्न सुंदर महाराज यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. त्यांनतर फडणवीस हे भुसावळ येथील जाहीर सभेसाठी रवाना झाले.