जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगावातच पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांना वारंवार आंदोलन करण्याची वेळ येत आहे. एकीकडे गुलाबराव पाटील यांचा उल्लेख त्यांच्या समर्थकांकडून पाणीवाला बाबा असा केला जातोय. गुलाबराव पाटील हे सुद्धा स्वत:ला पाणीवाला बाबा म्हणतात. तर दुसरीकडे राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातच पिण्याच्या पाण्यासाठी वाणवा आहे. जिल्ह्यातील पाडळसरे धरणासारखा प्रकल्प पुढे सरकताना दिसत नाही. खरंतर तो विषय खूप मोठा आहे. पाडळसरे धरण कधी होणार? हा विषय तर फार लांबचाच आहे. पण साधं पाणी पुरवठा मंत्र्यांच्या गावात आणि तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागत नसल्याचं भीषण वास्तव्य समोर आलं आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार आताचाच नाही. गेल्या कित्येक वर्षांपासूनचा हा पाणी प्रश्न आहे. पण प्रश्न सुटताना दिसत नाहीय. हा पाणी प्रश्न सध्याच्या घडीला प्रचंड जाणवतोय. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. तर दुसरीकडे ‘हर घर जल’, या केंद्राच्या योजनेचे कामं महाराष्ट्रात सुरु आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत गावातून मतदान पडलं नाही म्हणून आमच्या गावाच्या पाणी योजनेवर लाल शेरा मारल्याचा आरोप लोणवाडी गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. हा प्रकार खरंच खूप भीषण आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या तब्बल 55 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. 23 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा होतोय. पाणी पुरवठा मंत्री जळगावचे असूनही मण्यारखेडा गावात मनसेने टँकरच्या साहाय्याने पाणी दिलं. तर नशेराबाद गावात नागरिकांनी पाण्यासाठी घागरी फोडल्या.
विशेष म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात तब्बल 12 दिवसांनी पाणी येतं. तर तिथून अवध्या काही किमीवर असलेल्या धरणगावात तब्बल 22 दिवसांनी पाणी मिळतंय. जळगावचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ज्या गावातून पाण्याची मागणी आली त्या गावात पाणी पुरवले असल्याचा दावा केलाय.
दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 5 जुलैपासून दररोज गावाला पाणी देण्याचं आश्वासन आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दिलं आहे. सध्या पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाईपलाईनची टेस्टिंग देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून पाळधी गावात केली आहे.
पाण्यासाठी मनसे आणि नागरिकांनी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधत हंडा मोर्चा काढला होता. तर आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याच मतदारसंघातील धरणगावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे.