सर्वात मोठी बातमी, जळगावात भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी, शिवसेना आमदाराचा भाजपवर निशाणा

| Updated on: Jun 14, 2024 | 6:13 PM

अमोल शिंदे हे ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील, करणं पवार यांच्या यांच्यासोबत मागच्या दरवाजाने मातोश्रीवर गेले होते. अमोल शिंदे उबाठामध्ये प्रवेशाच्या तयारीत होते. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानसभेचे उमेदवारी नाकारली. उद्धव ठाकरेंनी भडगाव पाचोरा विधानसभेचे उमेदवारी वैशाली सूर्यवंशी यांना जाहीर केल्याने अमोल शिंदे मागच्या दाराने परत आले", असा मोठा दावा किशोर पाटील यांनी केला.

सर्वात मोठी बातमी, जळगावात भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी, शिवसेना आमदाराचा भाजपवर निशाणा
शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील
Follow us on

जळगावात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. किशोर पाटील आणि भाजपाचे अमोल शिंदे हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या अमोल शिंदे यांचा दावा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्यात वार-पलटवार सुरु आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक लागण्याआधीच जळगावात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजपने स्पष्ट करावे की, अमोल शिंदे आमची परवानगी घेऊन बोलतोय, असं किशोर पाटील म्हणाले आहेत.

“अमोल शिंदे यांनी पाचोरा-भडगाव विधानसभेतून निवडणूक लढवावी विरोधक म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा असतील. लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर अमोल शिंदे महायुतीवर टीका करायला लागले आहेत. अमोल शिंदे माझ्यावर टीका करत आहेत म्हणजे महायुतीवर टीका करत आहेत”, असं किशोर पाटील म्हणाले.

अमोल शिंदे मागच्या दरवाजाने ‘मातोश्री’वर गेले?

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते गिरीश महाजन यांना सर्वांना माझे आवाहन आहे. अमोल शिंदेंकडे भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा प्रमुखाची जबाबदारी आहे आणि ते सरकारवर महायुतीवर आरोप करत आहेत. अमोल शिंदे हे ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील, करणं पवार यांच्या यांच्यासोबत मागच्या दरवाजाने मातोश्रीवर गेले होते. अमोल शिंदे उबाठामध्ये प्रवेशाच्या तयारीत होते. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानसभेचे उमेदवारी नाकारली”, असा मोठा आरोप किशोर पाटील यांनी केला.

“उद्धव ठाकरेंनी भडगाव पाचोरा विधानसभेचे उमेदवारी वैशाली सूर्यवंशी यांना जाहीर केल्याने अमोल शिंदे मागच्या दाराने परत आले. उन्मेश पाटील, करण पवार, अमोल शिंदे हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे सर्व माहीत असताना आम्ही सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. इतक्या कठीण परिस्थितीत स्मिता वाघ यांना 16 हजाराचे मताधिक्य तालुक्याने दिलं”, असा दावा किशोर पाटील यांनी केला.

‘भाजपने अमोल शिंदेंची हकालपट्टी करावी’, आमदार पाटलांची मागणी

“भाजपच्या प्रमुख नेत्यांनी एकदा स्पष्ट करावं अमोल शिंदे आमच्या परवानगीने बोलतो. अमोल शिंदे महायुतीत असताना शासनावर आरोप करत असेल तर याला भाजपचा पाठिंबा आहे का? तसं नसेल तर भाजपने अमोल शिंदेंची हकालपट्टी करावी. आठ दिवसात महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उलथापालत आहे आणि त्यात अमोल शिंदे यांचा देखील नंबर आहे”, असा मोठा दावा किशोर पाटील यांनी केला.

“अमोल शिंदे यांनी भाजपची सेल फेकावी आणि ओपन यावं. आम्ही खंबीर आहोत. उत्तर देताना आम्हाला देखील कुठेतरी विचार करावा लागतो. भाजपने एकदा या सर्व विषयांवर चर्चा करून अमोल शिंदे यांची हकलपट्टी करावी. नाहीतर मान्यता द्यावी”, असं किशोर पाटील म्हणाले.

“माझी बहीण वैशाली सूर्यवंशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेल्याने मला त्याचा फायदा आहे. वैशाली सूर्यवंशी उद्धव ठाकरेंकडे गेल्या नसत्या तर अमोल शिंदे त्यांच्याकडे जायला तयार होते. कदाचित तो मोठा फटका मला बसला असता. आता आम्ही दोघे भाऊबहीण ठरवू काय करायचे ते”, असं मोठं वक्तव्य किशोर पाटील यांनी केलं.

मंत्रिपद घेणार का?

“गिरीश भाऊ साधा सोपा माणूस नाही गिरीश महाजन महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. गिरीश महाजन यांना माहित आहे त्यांचे निकटवर्तीय कोण आहेत. दिवसभरात अशा अनेक अमोल शिंदेंना गिरीश महाजन फिरवत असतात. मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार झालाच तरी मी मंत्रीपद घ्यायला तयार नाही. विधानसभेला कमी कालावधी उरल्याने मतदारसंघात कार्यकर्त्यांना वेळ द्यायचा आहे. त्यामुळे मी मंत्रीपद घेणार नाही”, असं किशोर पाटील यांनी स्पष्ट केलं.

“भाजप वर्सेस शिवसेना वाद नाही. खरी भाजप माझ्याबरोबर आहे. अमोल शिंदे म्हणजे भाजप नाही ती एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स घ्यायला कोणताही सभासद मतदारसंघात तयार नाही. अमोल शिंदे आणि त्यांची ट्रक भर भाजपा त्यांच्यासोबत आहे. प्युअर भाजपा माझ्यासोबत आहे”, असा दावा किशोर पाटील यांनी केला.