जळगाव : जिल्हा दूध संघावर ( Co-operative Societies) नियुक्त केलेल्या प्रशासन मंडळाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. असे असतानाच दुसरीकडे गिरीश महाजन समर्थक मुख्य प्रशासक म्हणून भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) तसेच इतर प्रशासकीय मंडळातील सदस्यांनी (Board of Directors) आज दूध संघाचा ताबा घेत खडसेंना आव्हान दिले आहे. शासनाने नियुक्त केलेले हे प्रशासक मंडळ नियमबाह्य असल्याचे सांगत या विरोधात एकनाथ खडसेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. याबाबत खडसेंनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
असे असतानाच आज नियुक्त प्रशासक मंडळांतील सदस्यांनी जिल्हा दूध संघाचा पदभार घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नियुक्त प्रशासक मंडळ व खडसे यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मी शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याचे यावेळेस आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. खडसे यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळं आता कोर्टातच यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल. तोपर्यंत मंगेश चव्हाण हे प्रशासन सांभाळणार आहेत. दूध संघ हातात असणे फार महत्त्वाचे असते. एकनाथ खडसे यांच्यासाठी यामुळंच हा धक्का मानला जात आहे.
कोणाला प्रशासकीय मंडळ बेकायदेशीर वाटत असेल त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. सहकार क्षेत्रातील काही तरतुदी मी वाचलेल्या आहेत. कोणी कायद्याचा अभ्यास जास्त केला असेल. पण मी माझ्या माहितीनुसार एक वर्षाच्या वरती संचालक मंडळ असणे याबाबत कायद्यात कुठलीही तरतूद नाही. या संचालक मंडळाला सात वर्षे पूर्ण झाले आहेत. शासनाने त्यांचा अधिकार सहा वर्षाच्या वर कुठलीही बॉडी काम करू शकत नाही. ज्याला काही वाटत असेल त्याने न्यायालयात दाद मागितली असेल. न्यायालय योग्य निर्णय घेईल असे जळगावच्या दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.