जळगाव : जळगावमध्ये एसटी कर्मचार्यांचा बेमुदत संप सुरु आहे. संप सुरु असल्यापासून गेल्या 70 दिवसांनंतर आता एसटी कर्मचारी संघटना समोर आल्या आहेत. एसटी कर्मचार्यांनी कामावर रुजू व्हावे असे अन्यथा नागरिकांच्या सोयीसाठी संघटनेमार्फत बस सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी भूमिका भारतीय एसटी कामगार संघटनेने घेतली आहे. संघटनेच्या या भूमिकेमुळे या संपात आता एसटी.कर्मचारी आणि कर्मचारी संघटना आमनेसामने आल्याचे पहावयास मिळत आहे.
भारतीय कामगार संघटनेची भूमिका काय?
भारतीय एसटी कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली. एसटी कर्मचार्यांच्या संप तसेच मागण्याबाबत उच्च न्यायालयात कामकाज सुरु आहे. न्यायव्यवस्थेवर कर्मचार्यांनी विश्वास ठेवावा तसेच नागरिकांचे हाल होत असल्याने उच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कर्मचार्यांनी कामावर रूजू व्हावे असे आवाहन यावेळी राजेश सोनवणे यांनी केले. कर्मचारी कामावर हजर झाल्यावर त्यांचे निलंबन तसेच कारवाई मागे घेण्याबाबतही पाठपुरावा करण्यात येईल, उच्च न्यायालयाचा विलिनीकरणाबाबत कर्मचार्यांच्या बाजूने निकाला लागला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असेही सोनवणे म्हणाले.
परबांच्या अहंकारामुळे संप चिघळल्याचा आरोप
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अहंकारामुळे हा संप चिघळल्याचाही आरोप राजेश सोनवणे यांनी केला. आंदोलनाला राजकीय किनार प्राप्त झाल्याने भाजप आणि शिवसेनेच्या लढाईत मात्र एसटी कर्मचार्यांचा नाहक बळी जात असल्याचा आरोपही यावेळी राजेश सोनवणे यांनी केला. तसेच कर्मचार्यांनी राजकीय पक्षांच्या नादी लागू नये, कामावर रुजू व्हावे, बस कर्मचारी कामावर रुजू झाले नाही तर संघटना म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी बससेवा किंवा इतर पर्यायी व्यवस्था सुरु करण्यात येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.