जळगाव : जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण आख्खं जग जिंकू शकतो, असं म्हणतात. मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर म्हणजेच सिकंदर राजा हा जग जिंकायला निघाला होता. त्याने आपल्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही, असा त्याचा इतिहास आहे. त्याला तेव्हा जिथपर्यंत भूमी आहे म्हणजे समुद्र लागत नाही तोपर्यंतचा प्रदेश जिंकायचा होता. त्याने मोठमोठ्या मोहिम्या केल्या आणि तो त्या मोहिम्या जिंकला. अर्थात त्याने जग जिंकली नाही. पण त्याच्या त्या धाडसामुळे त्याला जगज्जेता मानलं जातं.
या सिकंदरचं उदाहरण सांगण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक घरामध्ये असे सिकंदर आहेत जे अतिशय बेताच्या परिस्थितीसोबत दोन हात करुन मुख्य प्रवाहात येतात. स्वत:ला शिक्षणाच्या जोरावर सिद्ध करतात. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात. आम्ही आज अशाच एका महान व्यक्तीची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहोत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्राचार्य डॉ. सुरेश गोसावी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. सुरेश गोसावी यांनी केलेली प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे सगळं यश त्यांनी संपादीत केलं आहे. सुरेश गोसावी यांचं हे यश गरिब, होतकरु कुटुंबांमधून पुढे येणाऱ्या तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
सुरेश गोसावी यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांचे वडील हे माध्यमिक शाळेचे शिक्षक होते. तर आई यांचं शिक्षण झालेलं नव्हतं. त्या गृहिणी होत्या. असं असलं तरीही सुरेश गोसावी यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणापुढे कधीच आर्थिक परिस्थिती येऊ दिली नाही. त्यांनी आपल्या तीनही मुलांना उच्च शिक्षित आणि मोठं केलं.
डॉ. सुरेश वामनगिर गोसावी हे . परिस्थितीशी दोन हात करून रॉकेलच्या कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचे ही वस्तुस्थिती होती. पण त्यांची या मेहनतीने यश मिळवून दिलं. ते महाराष्ट्रात शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत.
सुरेश गोसावी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील धामणगाव गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील नूतन मराठा विद्या प्रसारक सहकारी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विभागात शिक्षक म्हणून नोकरीत होते. त्यामुळे जिथं बदली होईल तिथं डॉ. सुरेश यांचं शिक्षण होत गेलं. त्याप्रमाणे त्यांचं प्राथमिक शिक्षण चांदसर गावी झालं.
त्यांचं दहावी-बारावी शिक्षण जळगावच्या नूतन मराठा कॉलेजला झालं. तर पदवी शिक्षण त्यांनी जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात घेतलं. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पुण्यात तर अमेरिकेत ते फेलोशिपसाठी गेले होते.
डॉ. गोसावी यांचे वडील 90 वर्षांचे आहे. ते धामणगाव याच गावी पत्नी, लहान सून आणि नातूसह राहतात. मुलगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान झाल्याने गोसावी कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.