ट्रॅक्टर चालकाच्या मुलीची आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड, या जिल्ह्याचे नाव ठरवले सार्थ

| Updated on: Apr 11, 2023 | 11:57 AM

क्रीडा प्रशिक्षक अजय देशमुख यांनी रेखा हिला पारखलं. रेखा हिला त्यांनी बेसबॉलचं प्रशिक्षण दिलं.

ट्रॅक्टर चालकाच्या मुलीची आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड, या जिल्ह्याचे नाव ठरवले सार्थ
Follow us on

खेमचंद कुमावत, टीव्ही ९ प्रतिनिधी, जळगाव : चाळीसगातील तालुक्यातील वाघळी या गावातील रेखा ही अतिशय गरीब कुटुंबातील. तिचे वडील ट्रॅक्टरवर चालक म्हणून मजुरी काम करतात. चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालयात ११ वी ते पदवीपर्यंत रेखा हिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. याठिकाणी शिकत असताना जेव्हा रेखा बेसबॉल खेळायला मैदानात उतरली. त्याचवेळी ती क्रीडा प्रशिक्षक अजय देशमुख यांनी रेखा हिला पारखलं. रेखा हिला त्यांनी बेसबॉलचं प्रशिक्षण दिलं. हलाखीची परिस्थिती असल्याने रेखा हिच्या मार्गात कुठलाही अडथळा निर्माण होवू नये. यासाठी अजय देशमुख यांनी असोसिएशन माध्यमातून तसेच वैयक्तिकरित्या खर्चाची जबाबदारी उचलली.

रेखा हिने सुध्दा प्रशिक्षक अजय देशमुख यांचा विश्वास सार्थ ठरविला. रेखा हिने बेसबॉलच्या महिलांच्या भारताच्या संघात आपलं स्थान‍ निश्चित केलं. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र मेहनत करत राहिले, त्यांच फळ मिळाल्याचे रेखा सांगते. या यशाचं श्रेय ती तिचे आई वडिलांबरोबरच क्रीडा शिक्षक अजय देशमुख यांना देते.

हे सुद्धा वाचा

भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद

भारतीय संघात निवड झाल्याचा प्रचंड आनंद आहे. या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा विश्वास बोलताना रेखा हिनं व्यक्त केलाय. माझ्याप्रमाणेच ग्रामीण भागातील इतरही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत म्हणून भविष्यात प्रयत्न करणार असल्याचेही रेखा सांगते. आई वडिलांबरोबरच लग्नानंतर पती तसेच सासरचेही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचे रेखा धनगर सांगते.

आमदारही मदतीसाठी सरसावले

रेखा हिच्या यशामुळे केवळ चाळीसगावचे नाहीतर संपूर्ण जिल्ह्यात नाव देशपातळीवर उज्जल झाले. रेखा हिच्या भारतीय संघात निवड झाल्याचा मोठा अभिमान चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केलाय. तसेच भविष्यात रेखा हिला कुठलीही अडचण येवून नये आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रेखाचं पालकत्व स्वीकारत कौतुकाची थाप दिली आहे.

हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार

प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वास असला की, आपण आकाशालाही ठेंगण करु शकतो. या वाक्याला जळगावच्या चाळीसगाव तालक्यातील रेखा पुना धनगर मुलीनं खरं ठरविलं आहे. ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची भारताच्या बेसबॉल महिला संघात निवड झाली आहे. हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेखा ही भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.