उन्मेष पाटील यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर, उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतर भावूक

| Updated on: Oct 22, 2024 | 5:29 PM

उद्धव ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीसाठीचा पहिला उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाकडून चाळीसगावातून उन्मेष पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. स्वत: उन्मेष पाटील यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी उन्मेष पाटील यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

उन्मेष पाटील यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर, उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतर भावूक
उन्मेष पाटील यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर
Follow us on

खेमचंद कुमावत, Tv9 मराठी प्रतिनिधी, जळगाव : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे उन्मेष पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देखील दिल्याची माहिती आहे. उन्मेष पाटील यांच्या कुटुंबीयांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत माहिती दिली आहे. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर उन्मेष पाटील यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. गेल्या काही महिन्यांपासून उन्मेष पाटील यांच्याभोवती ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या आठवून पाटील कुटुंबीयांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. यावेळी उन्मेष पाटील यांच्या वडील भैय्यासाहेब पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. उन्मेष पाटील यांच्या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी त्यांना साथ दिली. तसेच विधानसभेची उमेदवारी देवून एबी फॉर्मदेखील दिला आहे, अशी पाटील उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी दिली.

“होय, उन्मेष पाटील यांची उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करून त्यांना एबी फॉर्म दिला”, असं भैय्यासाहेब पाटील म्हणाले. भाजपचे विद्यमान खासदार असताना भाजपने उन्मेष पाटील यांचे जळगाव लोकसभेचे तिकीट कापले होते. यावेळी उन्मेष पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. “उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात दुःख आहे”, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी दिली.

उन्मेष पाटील यांचे वडील काय म्हणाले?

“उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झालेली नसताना उद्धव ठाकरेंनी त्यांना एबी फॉर्म दिला आहे”, अशी माहिती उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी दिली. “वास्तविक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जागा असताना राजीव देशमुख यांनी मोठे मन करून उमेदवारी मिळवून दिली. त्यांचे मी आभार व्यक्त करेन”, असंही भैय्यासाहेब पाटील यावेळी म्हणाले.

उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना अश्रू अनावर

यावेळी उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांनादेखील अश्रू अनावर झाले. संपदा पाटील यांनी देखील यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “उमेदवारी आणि एबी फॉर्म मिळाल्याचा आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली. “2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं कमळ पोचवण्यासाठी आम्ही कष्ट घेतले होते. उन्मेष पाटील यांनी कमळाचे नेतृत्व करून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर कमळ फुलवले होते. खासदार असताना एवढं चांगलं काम करून 2024 मध्ये बहुजन समाजातील उच्च शिक्षित तरुणाला पक्षाने नाकारलं. स्वतःच्या मित्रांनी त्यांच्यामागे कट कारस्थान, षडयंत्र करून त्यांचा घात केला आणि त्यांच्यावर ही वेळ आली”, असं म्हणत संपदा पाटील यांनी नाव न घेता आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली.

‘नवी सुरुवात होतेय’

“खासदारकी चाळीसगावकरांचे भूषण असताना त्यांना पक्षाने डावललं. आज उद्धव ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीने उन्मेष पाटलांना न्याय दिला आहे. ही लढाई 20 वर्षे केलेला हा तप आहे. या तपाची आज पुन्हा एकदा नवी सुरुवात झाली आहे. बहुजन समाजातील उच्चशिक्षित तरुण ज्याला डावलले गेले, आज नवी सुरुवात होत आहे”, असं संपदा पाटील म्हणाल्या.

संपदा पाटील यांचा मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा

“अश्रू यासाठी अनावर होत आहे की, 20 वर्ष तप करून आम्हाला आज या मार्गाने जावं लागत आहे. पक्षाने जरी षडयंत्र केलं तरी जनतेने नेहमी विश्वास दाखवला. यामुळे विजयाची खात्री आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांचा चेहरा वापरून तंबू टाकून आमदार होऊ शकतो हे आम्ही पेरलेलं कमळ होतं. खासदारकी असेल, त्यांचं नेतृत्व कसं संपवण्यात येईल, असे कटकारस्थान करणारे तेच असावेत”, असं म्हणत संपदा पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. “उन्मेष पाटील देशातले एकमेव खासदार आहे सत्तेला सोडून ते सर्वसामान्यांचा आवाज बनले आहेत”, असंही संपदा पाटील यावेळी म्हणाल्या.