पुणे ते अयोध्या सायकलवारी! मराठमोळ्या रामभक्ताची देशात चर्चा

| Updated on: Jan 11, 2024 | 4:18 PM

अयोध्येत श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारलं जात आहे. या मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होणार आहे. अयोध्येत राम मंदिरांचं उद्घाटन होत असल्याने भाविकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. याच आनंदात अमळनेरचा एक तरुण सायकलवरुन अयोध्येला निघाला आहे.

पुणे ते अयोध्या सायकलवारी! मराठमोळ्या रामभक्ताची देशात चर्चा
Follow us on

जळगाव | 11 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनासाठी देशभरातील भाविक अयोध्येला रामलल्लांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. खान्देशातील एक तरुणदेखील रामलल्लाच्या दर्शनासाठी निघाला आहे. विशेष म्हणजे हा तरुण सायकलीने पुणे ते अयोध्या प्रवास करत आहे. त्यामुळे या तरुणाची राज्यात चांगलीच चर्चा होत आहे. या तरुणाचं नाव आशिष दुसाने असं आहे. हा तरुण जळगावच्या अमळनेरचा रहिवासी आहे. तो अयोध्येत रामलल्लाच्या उत्सवासाठी पुणे ते अयोध्या सायकलवारी करत आहे. आशिष दुसाने या तरुणाची रामलल्लाच्या दर्शनासाठी जुन्नर ते अयोध्या सायकलवर संकल्पयात्रा आहे. या यात्रेदरम्यान आशिष दुसाने अमळनेर येथे दाखल झाला तेव्हा रामभक्तांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. विशेष म्हणजे आशिष रस्त्याने जाताना मंदिरात थांबून राममंदिर, अयोध्या यांचा इतिहास तसेच राजकीय आणि न्यायालयीन संघर्ष याबाबत जनतेसमोर कथन करतोय.

अमळनेर येथील सुपुत्र कवी आशिष दुसाने याने पुणे शिवजन्मभूमी ते रामजन्मभूमी अयोध्या अशी सायकलवर संकल्पयात्रा सुरू केली आहे. तो 22 जानेवारीला अयोध्या रामलल्ला उत्सवाला पोहचणार आहे. या तरुणाचे अमळनेर येथे राम भक्तांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. आशिष दुसाने हा अमळनेरचा रहिवाशी असून पुण्यामध्ये यशभारती फौंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना मोफत एमपीएससी, यूपीएससी मार्गदर्शन देतो.

आशिष दुसाने ‘या’ मार्गाने सायकलीने अयोध्या पोहोचणार

आशिष दुसाने याने जुन्नर येथील माती आणि पाणी घेऊन संकल्प यात्रेला सुरुवात केली आहे. आशिष हा सायकलवरून जुन्नरहून, संगमनेर , कोपरगाव, मालेगाव, धुळे, अमळनेर येथे संत सखाराम महाराज, मंगळ ग्रह मंदिराचे दर्शन घेऊन इंदौर, उज्जैन, बागेश्वर धाम, मिर्झापूर, काशी, प्रयागराज, सुल्तानपूर प्रतापगड मार्गे अयोध्याला पोहचणार आहे. पुण्याचा पुण्यईश्वर, काशीचा विश्वेश्वर आणि श्रीकृष्ण भूमी मुक्त करण्यासाठी तो रामाला साकडे घालणार आहे. रस्त्याने जाताना आशिष वेगवेगळ्या मंदिरामध्ये थांबून राममंदिर, अयोध्या यांचा इतिहास सांगून राजकीय आणि न्यायालयीन संघर्ष सविस्तर जनतेला कथन करीत आहे.