महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर खातेवाटप देखील झालं. आता मंत्र्यांच्या दालनाचं वाटप आणि त्या पाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. यानंतर आता पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री राहणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे पालकमंत्रीपदाबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन मंत्री आहेत. त्यामुळे त्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. अनेकांकडून तर पालकमंत्रीपदाबाबत इच्छा देखील व्यक्त करण्यात आली आहे. या दरम्यान जालना जिल्ह्यात मंत्री अतुल सावे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध करण्यात आला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी अतुल सावे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध केला आहे. अतुल सावे यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मित्रपक्षांसह सामान्य नागरिकांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केला आहे. तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती त्यावेळी अतुल सावे फिरकले सुद्धा नाही, अशीदेखील टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंत्री अतुल सावे हे पुन्हा एकदा जालन्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यानंतर महायुती मधलाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला थेट विरोध केलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी अतुल सावे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
मागील अडीच वर्षात अतुल सावे यांच्याकडे जालन्याचे पालकमंत्री पद असताना मित्रपक्षासह सामान्य नागरिकांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप यावेळी भाऊसाहेब घुगे यांनी केला आहे. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर सावे यांनी गुन्हे दाखल केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकारींनी केलाय. त्यामुळे जालन्याचा पालकमंत्री कोण होणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.