जालना | 2 सप्टेंबर 2023 : छत्रपती घराण्याचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात गेले. त्यांनी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी उदयनराजे यांच्याकडे घडलेला सर्व प्रकार सांगितला. राजे तुम्ही सांगितलं तर मी आंदोलन मागे घेईन, घरी जाईन, असं जरांगे पाटील यावेळी उदयनराजे यांना म्हणाले. यावेळी उदयनराजे यांनी माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. पण चर्चेशिवाय गोष्टी सुटणार नाहीत, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
आपण गुरांनाही इतकं मारत नाही. लाठीचार्जचा आदेश देणाऱ्यांना निलंबित करायला लावणार, असं आश्वासन यावेळी उदयनराजे भोसले यांनी मराठा आंदोलकांना दिलं. विशेष म्हणजे उदयनराजे जेव्हा मंचावर बसले होते त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील तिथे आले. शरद पवार यांनी यावेळी उदयनराजे यांचं कौतुक केलं. शरद पवारांनी भाषणानंतर उदयनराजे यांच्याकडे माईक दिला. यावेली उदयनराजेंनी मोठा इशारा दिला.
तुम्ही चर्चेला तयार राहा. मी गुन्हे मागे घ्यायला लावतो, असं उदयनराजे जरांगे पाटील यांना म्हणाले. येत्या दोन दिवसांत बैठका घेतो असं उदयनराजे यावेळी म्हणाले. “हा जो अनुचित प्रकार घडला त्यासंबंधी चौकशी होईल. लाठीचार्ज करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. मराठा आंदोलकांना आरक्षण मिळायला हवं. खरंतर हे फार वर्षांपूर्वी व्हायला होतं. ज्यावेळेस अशाप्रकारचा अन्याय होतो त्यावेळेस उद्रेक होणं स्वभाविक आहे”, असं उदयनराजे म्हणाले.
माझी सर्वांना विनंती आहे की, आपल्या शांततेत आंदोलन करायचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल माझी भेट झाली. या दोन-तीन दिवसातच चर्चा करुन लवकरात लवकर आंदोलकांची भेट घालून देऊ. एक-दोन नाही तर 57 महामार्चा झाले पण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पण त्याचा असा अर्थ नाही की मराठा समाज सहन करतो म्हणून प्रतिक्षा करावी. इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं.
गायकवाड कमिशनमध्ये ज्या थोड्याफार चुका होत्या त्यामध्ये दुरुस्ती करुन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं. मी सर्वांना आवाहन करतो. आपल्याला शांततेनं आंदोलन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण पाईक आहोत. असं असताना मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर यापेक्षा दुर्देवी बाब नसेल.
या एक-दोन दिवसात संपूर्ण चर्चा घडून आणतो. प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे. कुटुंबासाठी तुम्ही प्रिय आहात. त्यामुळे तुम्हाला कुणालाही दुखापत होऊ नये. काल डीएसपींनी जे ऑर्डर दिले त्याचा मी तीव्र निषेध करतो. मी तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देईन. मनोज यांनी केलेले सर्व मागण्या मान्य होतील.