जालना | 17 नोव्हेंबर 2023 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज अंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार परिषदेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी लाठीचार्जच्या घटनेवर टीका केली. याशिवाय मनोज जरांगे मांडत असणाऱ्या मुद्द्यांवरही भुजबळांनी टीका केली. तसेच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारने जी पावलं उचलली त्यावरही छगन भुजबळांनी टीका केली. मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला देखील भुजबळांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. “आमची लेकरंबाळं, आमची लेकरंबाळं… मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का रे बाबा… भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्व कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, असा घणाघात छगन भुजबळांनी केला.
“आरक्षणाच्या मुद्द्यावर इंद्रा साहनी केस झाली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं प्रत्येक राज्याचा आयोग निर्माण करायचा आणि त्या माध्यमातून आरक्षण द्यायचं. 16 नोव्हेंबर 92ला हे अधिकार राज्य आणि केंद्राकडून काढून घेतले. त्यानंतर ते आयोगाकडे गेले. मराठा आरक्षणासाठी त्यावेळीही आंदोलने झाले. खत्री आयोगापासून अनेक आयोगांनी सांगितलं आरक्षण देता येणार नाही. आमचा दोष आहे. आम्ही काय केलं. आम्हाला तर घटनेनं दिलं. बाबासाहेबांनी दिलं. मंडल आयोगाने दिलं. नऊ न्यायाधीशांनी त्यावर शिक्का मारला. यांना काहीच माहीत नाही”, अशी टीका भुजबळांनी केली.
“हे आरक्षण गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. आज 75 वर्ष झाली. दलित समाजाला संविधानाने आरक्षण दिलं. एसपी झाले, कलेक्टर झाले, आयएएस झाले… पण आजही या झोपडपट्ट्यातून आमचे गोरगरीब दलित बांधव राहतो. गरीबी दूर झाली नाही. ओबीसींचीही गरीबी दूर झाली नाही. हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. जे वर्षानुवर्ष पिचलेले आहेत. दबलेले आहेत. त्यांना वर आणण्यासाठी दिलेलं हे आरक्षण आहे. हे आरक्षण म्हणजे काय आहे हे तर समजून घ्या”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“सुरुवातीला २५० जाती होत्या. आता ३७५ हून अधिक जाती होत्या. आयोगाकडे गेले आणि आयोगाने म्हटलं घ्या. आम्ही घेतलं. नकार दिला नाही. तुम्ही या पण कायद्याने या. दादागिरी करू नका. मराठा समाजाला काही मिळत नाही असं आहे का? चंद्रकांत पाटील समिती आणि इतरांनी दिलेला रिपोर्ट पाहा. मराठ्यांच्या योजनांसाठी कोट्यवधी रुपये वाटण्यात आले”, असा दावा भुजबळांनी केला.
“मोदींनी दिलेलं १० टक्के आरक्षणात ८५ टक्के मराठा समाजाचे लोक आहेत. ६० टक्क्याच्यावर ४० टक्के आरक्षणात मराठा आहे. आमच्या २७ टक्क्यात कुणबीही आहे. तुम्हाला नाही असं नाही. मराठा विद्यार्थ्याला वस्तीगृह नसेल तर ६ हजार रुपये मिळतो. तो ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नाही. १० ते ११ हजार कोटी वाटले आहेत. ओबीसी महामंडळ आधीपासून आहे त्याला हजार कोटीही दिले नाही. द्या हिशोब. तुम्हाला हवंय घ्या. पण आमचं काय? द्या ना आम्हाला”, असं छगन भुजबळ म्हणाले.