जालना : आसूड फक्त हातात ठेवू नका तो वापरा, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते औरंगाबाद जिल्ह्यात दौऱ्यादरम्यान बोलत होते. सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं. तर, जनतेमध्ये गेल्याशिवाय जनसमर्थन मिळत नाही, हे आता उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं. अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. शेतकऱ्यांनी ठाकरेंवरच आसूड चालविला पाहिजे, असा पलटवार दानवे यांनी केलाय.
रावसाहेब दानवे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता बाहेर पडले. काही ठिकाणी दौरे करू लागलेत. याचं क्रेडिट हे त्यांना स्वतःला जात नाही. याचं क्रेडिट हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना जातं. कारण अडीच वर्षे ना मंत्रालयात गेले ना राज्यात गेले. घरी बसून कारभार केला.
राजा जोपर्यंत जनतेत राहणार नाही तोपर्यंत जनतेचे दुःख कळणार नाही. हे अनेकवेळा आम्ही त्यांना सांगितलं. पण, उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले नाही. आपलं कुटुंब आपली जबाबदारी एवढचं काम त्यांनी केलं. आता, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आपल्यासोबत घेतल्यावर सत्ताबदल झाला. तेव्हा लोकांत गेल्याशिवाय जनसमर्थन मिळत नाही. हे उद्धव ठाकरे यांना समजलं. त्यामुळं उद्धव ठाकरे हे लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे.
मला माहिती नाही किती ठिकाणी जाणार. पण, लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात हे चांगलं लक्षण आहे. विरोधी पक्षाचा माणूस जनतेत जातो. त्यांचे प्रश्न विचारतो. त्यांना शेतकऱ्यांनी आसूड दिला. तो आसूड चालविण्याचा त्यांनी सुतोवाच केला. त्यांचे प्रश्न यांनी सोडविलेले नाहीत. त्यामुळं पहिला आसूड यांच्यावर ओढला पाहिजे. नंतर त्यांनी अशी भाषा वापरली पाहिजे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.