जालनाः जालन्यात एका नेत्रालयात (Eye Hospital) चोरी झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे तीन वाजता नेत्रालयाचं शटर उचकटून चोरानं आतमध्ये प्रवेश केला. आतमधील ड्रॉवरही लॉक (Lock) केलेले होते. चोराने स्वतःसोबत आणलेल्या कटरच्या मदतीने लॉकर्सही उघडले. यातून पैसे चोरले. नेत्रालयातील इतरही ड्रॉवर्स त्याने उघडून पाहिले. टॉर्चच्या मदतीने सर्वत्र नजर टाकल्याचं सीसीटीव्हीत (Theft in CCTV) दिसत आहे. आज सकाळी नेत्रालयाचं शटर उघडलेलं दिसून आल्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेत 32 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील बालाजी नेत्रालयात सदर घटना घडली. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्याने आत प्रवेश करून येथील रक्कम लंपास केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
पहाटेच्या वेळी झालेल्या चोरीचा तत्काळ तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. त्यात चेहरा संपूर्णपणे झाकलेला चोर शटर उचकटून आत येताना दिसतो. दुकानातील सर्व ड्रॉवर्सवर गोल फिरून नजर टाकल्यानंतर या चोरानं मुख्य ड्रॉवर्स उघडायला घेतले. सोबत आणलेल्या कटरने त्याने ड्रॉवर उघडला. त्यातील पैसे स्वतःच्या खिशात टाकले. त्यानंतर वरील आणखी एक ड्रॉवर उघडून पाहिला. खोलीतील इतरही ठिकाणी टॉर्च घेऊन नजर फिरवली आणि चोर तेथून निघून गेला. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोराचा शोध घेत आहेत.