Arjun Khotkar Shivsena : भाजप अर्जुनरावांचा अभिमन्यू करणार? जालन्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठी घडामोड

| Updated on: Oct 24, 2024 | 5:14 PM

Jalna Vidhansabha Constituency : जालन्यात मोठी घडामोड घडली आहे. महायुतीमधील वाद आता जळजळीतपणे समोर आले आहेत. लोकसभेपासूनची कटुता आता चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Arjun Khotkar Shivsena : भाजप अर्जुनरावांचा अभिमन्यू करणार? जालन्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठी घडामोड
जालना विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेत शिलगली
Follow us on

जालन्यात महाविकास आघाडीशी पंगा घेण्याअगोदरच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. जालना विधानसभा मतदारसंघात (Jalna Vidhansabha Constituency)  युती धर्माला तिलांजली देत आता भाजपने शिंदे सेनेविरुद्धात दंड थोपाटले आहे. महायुतीत हा मतदारसंघ शिंदे सेनेला सुटला होता. शिदे सेनेच्या पहिल्या यादीत अर्जुनराव खोतकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. उमेदवारी जाहीर होताच भाजपने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अपक्ष म्हणून भास्कर दानवे मैदानात

जालन्यात अर्जून खोतकरांच्या (Arjun Khotkar) अडचणीत वाढ झाली. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भास्कर दानवे हे भाजपच्या जिल्हाउपाध्यक्ष पदावर आहेत. जालन्याची जागा ही महायुतीत भाजपला सोडण्यात यावी, यासाठी दानवे आग्रही होते. दानवेंनी निवडणुकीची तयारीही केली होती. मात्र ही जागा परंपरागत शिवसेनेकडे असल्यानं खोतकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भास्कर दानवे यांनी दुचाकी रॅली काढत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

अर्जुनरावांचा अभिमन्यू करणार?

रावसाहेब दानवे हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर या मतदारसंघातील समीकरणं बिघडली. काही लोकांनी मुद्दामहून विरोधात प्रचार केल्याचा भाजपचा आरोप आहे. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आता मोठी खेळी खेळण्यात येत आहे. रावसाहेब दानवे आणि अर्जुनराव खोतकर यांच्यातील सासू-सूनेचं भांडण जनतेला नवीन नाही. याचे किस्से स्वतःच रावसाहेब दानवे यांनी लोकसभा प्रचारावेळी रंगवून सांगितले होते. दरम्यान अजूनही आम्ही या जागेसाठी आग्रही असून मैत्रिपूर्ण लढत व्हावी अशी अपेक्षा असल्याचं भास्कर दानवे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे भाजप अर्जुनरावांचा अभिमन्यू तर करत नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

तर दुसरीकडे विधानसभेत जर त्यांनी आपले काम केले नाही तर आपणही त्यांचे काम करायचं नाही, असे अर्जुनराव खोतकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. हा भाजपला थेट इशारा होता. त्यामुळे विधानसभा निवडणूक आणि नंतरही महायुतीत जालन्यात दिलजमाई होण्याची शक्यता मावळली आहे.