जालना : सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. अंतरवली-सराटी येथे उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उठता, बसता येत नाहीय. आवाजही त्यांचा बिघडला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी आमरण उपोषणाला बसले. उपोषणा दरम्यान पाणी, अन्न घेणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं होतं. आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मनातील संताप व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील सारथीच्या विद्यार्थ्यांवर भडकले. स्वतंत्र उपोषण कशासाठी करता? तुमचा मुद्दा वेगळा आहे, आरक्षणाबाबत बोला. तुमच लग्न करण्यासाठीच चालू आहे. phd केली म्हणून हुशार झालात का? गरीब मराठ्यांच्या बाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. “ज्यांना कुणबी नावाने आरक्षण नको आहे म्हणणारे कमी आहेत. सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करत सरकारने कायदा पारित करावा” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
‘अमित शहा यांच्याशी आमचे देणे-घेणे नाही’
“मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून सरसकट आरक्षण द्यावे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे. गुलाल उधळला आहे. सर्व मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या. बाराशे तेराशे लोकांसाठी वेगळा कायदा करावा. 14 तारखेच्या बंद संदर्भात मला माहित नाही पण तसा काही महाराष्ट्र बंद होत असेल तर शांततेत बंद करावा. 15 तारखेला विशेष अधिवेशन घेतलं नाही तर कळेलच” असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. अमित शहा यांच्याशी आमचे देणे-घेणे नाही. मराठे काय आहेत त्यांना कळेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.