संजय सरोदे, Tv9 प्रतिनिधी, जालना | 14 फेब्रुवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत भलामोठा मोर्चा आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. जरांगे यांच्यासोबत लाखो मराठे वाशीला पोहोचले होते. इतक्या मोठ्या प्रमाणातील आंदोलकांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वाशीला जावून जरांगे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. पण मनोज जरांगे त्यांच्या अंतरवली सराटी गावात गेल्यानंतर त्यांनी आता पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांच्या दाव्यानुसार, सरकारने दिलेलं वचन पाळलेलं नाही. त्यामुळे ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची आता प्रकृती बिघडली आहे. मराठा कार्यकर्त्यांकडून जरांगे यांना पाणी पिण्याचं आवाहन केलं जातंय. पण जरांगे पाणी पिण्यास तयार नाहीत. याशिवाय ते उपचार घेण्यासही तयार नाहीत. त्यांना आज सलाईन लावण्यात आली. पण त्यांनी सलाईन तोडली.
मनोज जरांगे यांना अंतरवली सराटी गावचे नागरीक आणि मराठा आंदोलकांकडून उपचार घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पण मनोज जरांगे उपचार घेण्यास तयार नाहीत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज डॉक्टरांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली. पण मनोज जरांगे यांनी ती सलाईन काढायला लावली. “मी झोपेत असताना मला सलाईन लावली”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “सलाईन लावायची असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता ते सांगा”, असं मनोज जरांगे सरकारला उद्देशून म्हणाले आहेत.
सरकारला धारेवर धरा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केलं आहे. “मी एकटा मुंबई जाऊन बसेल, लवकर अंमलबजावणी करा”, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. “मी उपोषण करताना जर मेलो तर मला तसेच त्यांच्या दारात नेऊन टाका”, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे, अशी विनंती मराठा समाजाच्या नागरिकांनी केली. नागरिकांनी यावेळी उपचार घ्या, अशा घोषणाही दिल्या. पण मनोज जरांगे यांनी ऐकलं नाही. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपचार घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.