जालना | 13 फेब्रुवारी 2024 : “महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही”, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. “नुसतं नाटकं सुरु आहेत. तुम्हाला मराठे सोपे वाटतात का?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे यांचं चौथ्या दिवशीसुद्धा उपोषण सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आज विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचं आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. याउलट त्यांनी सरकारला पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिलाय. “काय नुसतं चाललं आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांचा घोटाळा मागे घेतला. पाच महिने झाले प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला राज्य शांत बघायचे नाही. पाच महिन्यांपासून फक्त प्रक्रिया सुरू आहे. आम्ही पण पोलीस विरोधात बीड आणि राज्यभर केस करायच्या आहेत. आमचेपण डोके फोडले आहेत. आम्हाला दोन हजार पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे आहेत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत? सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तर इकडे यायचे. तुम्ही 15, 16 तारखेनंतर मज्या बघा. दोन दिवसांत अधिवेशन घेणार होते. घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही 15, 16 तारखेनंतर बघा”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
“मिरज दंगल, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावरील गुन्हे कसे परत घेतले? पितृसत्ताक व्याख्या का घेतली? मी सांगितलेली व्याख्या घ्या. 31 तारखेपर्यंत सरकार राहणार आहे का? होत असेल तर खरी मध्यस्थी करा. सगेसोयरे कायदा अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅझेट, गुन्हे परत घ्या, शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्या, मी उपोषण कायमचे मागे घेतो. तुम्हाला वाटते का मराठे परत मुंबई येणार नाहीत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.