Manoj jarange patil | सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Nov 01, 2023 | 2:42 PM

Manoj jarange patil | मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात मनोज जरांगे पाटील यांना, सरकारला थोडा वेळ द्या, असं आवाहन करण्यात आलं. अनेक बडे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांनी मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

Manoj jarange patil | सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?
manoj jarange patil
Follow us on

जालना : “सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे?. सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे सांगाव. सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली? त्याचा तपशील जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “गोरगरीबाच्या लेकरावर गुन्हे दाखल करण्याच काम सरकारकडून सुरु आहे. ते हसण्यावारी नेतायत. आरक्षण द्या अरे-तुरे बोलण बंद करतो. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे” असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. “तुम्ही मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुमच्या मनात काय आहे? हे कळू दे. मराठा समाज दगाफटका करणारा नाही. आमच्याकडून खोट नाट वदवून घेऊ नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“सरकारचा अध्यादेश आम्हाला मान्य नाही. वेळ घेऊन सरसकट आरक्षण देणार का?. आम्हाला अर्धवट आरक्षण नको. आरक्षण मिळेपर्यंत आमच आंदोलन थांबणार नाही” असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. “चर्चा करायची हे आंदोलनाला बसण्याआधी का नाही सांगितलं?. आठ दिवस रक्त जाळल्यानंतर यांना जाग आली. पण मी माझ्या समजासाठी तयार आहे. मराठा समाजाला गरम केलं जातं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “यांना का आणि कशासाठी वेळ पाहिजे. हे त्यांनी इथे येऊन महाराष्ट्राला सांगाव. त्यानंतर आम्ही विचार करु” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

…तर यांचा आवाज 5 मिनिटात बंद होईल

“देवेंद्र फडणवीस यांनी इथे यावं, मराठे त्यांना अजिबात अडवणार नाहीत. मी चर्चेसाठी बोलावल पण ते आले नाहीत. आम्ही मनावर घेतलं, तर यांचा आवाज 5 मिनिटात बंद होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. त्यांनी आज संध्याकाळपासून पाणी बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील सध्या समाजाच्या विनंतीला मान देऊन पाणी पितायत. सहाव्यादिवशी त्यांची प्रकृती ढासळली होती. पण आता पाणी पिल्यामुळे प्रकृती थोडी बरी आहे.