छगन भुजबळ यांचं चॅलेंज जरांगेंनी स्वीकारलं? मनोज जरांगे येवल्यातून निवडणूक लढवणार?

| Updated on: Sep 06, 2024 | 9:12 PM

मनोज जरांगे पाटील यांना मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघात येवून निवडणुकीत पराभव करुन दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यांच्या या आव्हानावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांचं चॅलेंज जरांगेंनी स्वीकारलं? मनोज जरांगे येवल्यातून निवडणूक लढवणार?
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जरांगेंना चॅलेंज दिलं. मनोज जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सर्व 288 जागांवर निवडणूक लढवावी आणि येवल्यात स्वत: जरांगेंनी आपल्यासमोर निवडणूक लढावी, असं चॅलेंज छगन भुजबळ यांनी दिलं. भुजबळांच्या या चॅलेंज नंतर आम्ही मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे यांनी भुजबळांवर फार बोलणं टाळलं. मी छगन भुजबळांना मोजत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी जरांगेंनी आमदार राजेंद्र राऊत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

“काय करायचं ते जनता ठरवेल. सर्व वेळेवर कळेल. फक्त मराठा आरक्षणाला विरोध करु नको. मी सर्वच नेत्यांना सांगतो, मराठा आरक्षणाला विरोध करु नका. मराठा आरक्षणाला विरोध तर मग कितीही मोठा जहांगीरदार असूद्या, तो गेला म्हणजे गेला. त्याचा पराभव झाला. मी टीव्ही 9 च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, पुन्हा चाळे चालू केले ते बंद करा. आम्हाला कधी वाटतं चांगला माणूस आहे. तर कधी वाटतं की, गोड बोलून आमची मान छाटायची काम सुरु केलं का? बार्शीच्या आमदाराला सांगून मराठा विरुद्ध मराठा उभे करत आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘मी फडणवीसांना सांगतो, हे चाळे बंद करा’

“देवेंद्र फडणवीसांनी त्याला पूर्ण बळ दिलं आहे. पण तो निवडणुकीत टिकणार नाही. त्याने मराठ्यांच्या विरोधात जावू नये. तू जा मग तुला मराठे काय आहेत ते कळेल. तू तु्झ्या गल्लीपुरता बघू नको की तू आमदार झाला. आमदार राजेंद्र राऊत दादागिरी करायला जाऊ नकोस. देवेंद्र फडणवीस किंवा कुणीही कामाला येत नाही. दादागिरी करायला जाऊ नकोस, महाराष्ट्रात तुझ्यापेक्षा इर ना पीर आहेत. तुला सांगतो, तू आरक्षणाच्या फंद्यात पडू नकोस. देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठे मराठ्यांवर सोडायचं बंद कर. तुला देवेंद्र फडणवीस सांगतात तसं तू करतो. मी फडणवीसांना सांगतो, हे चाळे बंद करा”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

मनोज जरांगे यांचा मोठा इशारा

“मी छगन भुजबळांना मोजत नाही. पण मी देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक हा राऊत उभा केला. ही गरिबाची लढाई आहे. एकही मराठा सध्या आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करत नाहीत. चिरीमिरी खाणारे आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आणि आरोग्य मंत्र्यांच्या बंगल्यावर एक बैठक केली आणि तिथे काहीतरी शिजलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. जर मराठ्यांच्या आंदोलनाला राज्यात धक्का लागला तर राजेंद्र राऊत तुलाच नाही तर फडणवीसांनाही राज्यात फिरु देणार नाही”, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी केला.