जालना | 26 फेब्रुवाराी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आमरण उपोषण मागे घेतलं आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणार, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. पण उपोषण सोडत असताना त्यांनी आज पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा अंतरवली सराटी सारखी लाठीचार्जची घटना घडवून आणायची होती. त्यांना राज्यात दंगल घडवायची होती. पण मी तसं होण्यापासून वाचवलं, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलं. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज उपोषण सोडलं असलं तरी साखळी उपोषण सुरुच राहणार. तसेच दोन दिवसात चर्चा करुन पुढची दिशा ठरवणार, असं स्पष्ट केलं.
“काल 5 हजार महिला गोळा झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लाठीचार्ज घडवून आणायचा होता”, असा मोठा आरोप मनोज जरांगे यांनी केला. “माझी जनता आहे, असं वाटलं असतं तर त्यांनी महिलांवरील गुन्हे मागे घेतलं असतं. तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलं नाही. राज्यात पुन्हा एकदा दंगल झालं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं. राज्य बेचिराख झालं असतं. पण आम्ही घडू दिलं नाही. तुम्ही बंगल्यात लपून बसला असता पण राज्य जळालं असतं”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आमच्या डॉक्टरांना बोलावलं आहे. उपचाराला कुठे जायचं ते आम्ही ठरवू. उपचार इथे घ्यायचे की दुसरीकडे जायचं ते आम्ही ठरवू. पण मी हटणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी होती. ती जबाबदारी मी पार पाडली. 5 हजार महिला होत्या आणि 25 हजार लोकं होतं. देवेंद्र फडणवीस यांना रात्रीच काहीतरी घडवून आणायचं होतं. लोकं सैरावैरा रानात किती पळाले असते. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा लाठीचार्ज घडवून आणायचा होता. मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
“इथे आज सकाळी किंवा रात्रीसुद्धा लाठीचार्ज झाला असता तर सर्व मराठा समाज पेटून उठला असता. पुन्हा एकदा राज्य बेचिराख होण्यापासून मी वाचवलं आहे. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीस यांनीच केलं होतं. अजून केसेस मागे घेतलेला नाही. त्यांना आतापर्यंत वाटलं असतं की, माझी जनता आहे. तर त्यांनी केसेस मागे घेतल्या असत्या. त्यांनी पोलीस बाजूला सारावेत. सागरचा दरावाजा सोडावेत. यायला तयार आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की, मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी तयारीला लागा”, असा सल्ला मनोज जरांगे यांनी केला.