जालन्यातील वडीगोद्री गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळीच घोषणाबाजी झाली. यावेळी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. दोन्ही बाजूच्या आंदोलकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. वडीगोद्री येथून मनोज जरांगे यांच्या आंदोलकांच्या दिशेला गाड्या जात होत्या. त्याच दरम्यान आमच्या गाड्या सोडत नाहीत आणि त्यांच्या गाड्या का सोडतात? या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा आंदोलक समोरासमोर आले.
लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्या दोघांचे उपोषस्थळ जवळ-जवळ सुरु आहे. त्यामुळे दोन्ही समाजाचे आंदोलक तिथे जमत आहेत. अनेक वेळा कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. हजारो पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण परिसरात लागलेला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. या दरम्यान त्यांची प्रकृती आज बिघडली होती. पण जरांगे यांनी तरीही उपोषण मागे घेतलं नाही. त्यांचं उपोषण सुरुच आहे. मनोज जरांगे यांची अवस्था पाहून गावकऱ्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे यांनी ऐकलं नाही.
दुसरीकडे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी अंरवली सराटी गावाजवल वडीगोद्री येथे उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे देखील उपोषणाला बसले. त्यानंतर वकील मंगेश ससाणे यांनीदेखील ओबीसींच्या आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली.
मनोज जरांगे पाटील यांची आज प्रकृती बिघडल्याने मराठा समाजाचे अनेक आंदोलक अंतरवली सराटीत दाखल होत आहेत. अंतरवली सराटीत जाण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं जिथे उपोषण सुरु आहे, तिथूनच रस्ता जातो. त्यामुळे त्या रस्त्याने मराठा आंदोलकांच्या गाड्या जात आहेत. यामुळे दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये तिथे घोषणाबाजी होताना दिसत आहे. असं असताना पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल आहे.