‘देवेंद्र फडणवीस हे मराठे मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत’, मनोज जरांगे यांचा मोठा आरोप

| Updated on: Aug 06, 2024 | 5:50 PM

"आम्हाला राजकारणात ढकलू नका. जरांगे राजकारणात आला तर तुमचे फार हाल होतील. आम्हाला आरक्षण देऊन टाका. नाहीतर सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. नंतर मग आम्ही राजकारणात गेलो तर आम्हाला नाव ठेऊ नका", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. जरांगे यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस हे मराठे मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत, मनोज जरांगे यांचा मोठा आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप
Follow us on

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोपदेखील केला आहे. “गॅझेट संदर्भात कुणाशीही काहीही चर्चा नाही. माझ्याविरोधात फडणवीस इतरांना बोलायला लावत आहेत. ते स्वतः बोलत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठे मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. यावेळी मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. “येवल्यावाला चूप बसलाय. जी बैठक मराठ्यांच्या आरक्षणाबाबत घेतली ती आरक्षणबाबत नव्हती”, अस मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया दिली. “आंदोलकांनी संयम ठेवावा. हे एक सरकारचं अंग आहे. हे आंदोलन करायला लावणं हा षडयंत्राचा भाग आहे. आपापला पक्ष वाचवण्यासाठी सगळे धडपड करत आहेत. पण विधानसभेनंतर सत्ताच बदलणार आहे”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

“देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत तर मग जनता तुमची नाही का? मराठे तुमचे नाही का? मराठवाडा मिशन मग कशासाठी राबवतायत? शेती मालासाठी, पाण्यासाठी का मिशन राबवत नाही? मला बघून घेण्यासाठी मिशन राबवतायत का? मराठे कुणाच्याही सभा, प्रचारासाठी जाणार नाहीत. लोक यांना कंटाळून गेले आहेत. पण यांना वस्ताद भेटत नव्हता. मराठ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे. ही लाट सामान्यांची आहे. हा फरक सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आला आहे. नेता मोठा करण्यासाठी यांचं मिशन सुरू आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी यांचं मिशन सुरू आहे. आता हे लोक मोर्चे देखील काढणार आहेत”, असं मनोज जरांगे आक्रमकपणे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. “मी प्रकाश आंबेडकर यांच्यावर उत्तर देत नाही. त्यांचा आम्ही आदर करतो. उद्यापासून सोलापूरमधून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली सुरू होत आहे. मराठा समाजाला माझं आवाहन आहे की, एक दिवस काम बंद ठेऊन समाजासाठी द्या. सगळ्यांनी काम सोडून आपल्या जिल्ह्यातील रॅलीत सहभागी व्हा”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

‘…तर तुमचे फार हाल होतील’, मनोज जरांगे यांचा इशारा

“आम्हाला राजकारणात ढकलू नका. जरांगे राजकारणात आला तर तुमचे फार हाल होतील. आम्हाला आरक्षण देऊन टाका. नाहीतर सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. नंतर मग आम्ही राजकारणात गेलो तर आम्हाला नाव ठेऊ नका. 29 तारखेला सगळं ठरेल. ही लाट गरिबांची आहे. सामान्य जनतेला वाटतं सर्व जातीधर्माला, राजकारण्यांना तुडवण्याची ही खरी वेळ आहे”, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“आम्हाला आरक्षण नाही म्हटल्यावर आम्ही रस्त्यावर येणारच आहोत. आम्ही 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान डेटा घेणार आणि चर्चा करणार आहोत. त्यानंतर 29 ऑगस्टला निर्णय घेणार. ही निवडणूक अशी राहील की सर्वसामान्य लोक आमदार होतील. एवढा मराठा समाज एकत्र येणार आहे. परिवर्तन गरजेचं आहे. आम्ही मुंबई, कोकणचा देखील दौरा करणार आहोत. शिवाय इथेही आम्ही बैठका घेणार आहोत. मुंबईचा देखील दौरा करणार पण वेळ कमी आहे. आरक्षण न देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचं मिशन सुरू आहे. ते मराठ्यांना, मुस्लिमांना छेडत आहेत. मिशन काढूनही यांना मतदान होणार नाही”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.