जालना | 5 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवली सराटे गावात गेलं. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, शिवसेना नेते संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. गिरीश महाजन यांनी आरक्षणासाठी 1 महिन्याचा कालावधी वाढवून मागितला. पण मनोज जरांगे उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहिले. याउलट त्यांनी राज्य सरकारला चार दिवसांची आणखी मुदत दिली. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांचं कौतुक केलं.
“मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. तुम्ही मला आरक्षण द्या. आमचा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार. मी सगळ्या पत्रकारांना सांगितलं होतं की, आरक्षणाचा आज जीआर आला नाही तर आजपासून पाणी पिणं बंद आणि औषध सुद्धा बंद. पण तुम्ही आलात म्हणून पुढचे चार दिवसही घेतो”, असं आश्वासन मनोज जरांगे यांनी दिलं.
“आमच्या लेकराचं वाटोळं होत आहे. दुसरं काही असतं तर सोडून दिलं असतं. इथे माझ्या जातीचा जीवन-मरणाचा विषय आहे. मी माझ्या समाजाला विषाच्या खाईत लोटू शकत नाही. तुम्ही आम्हाला पॉझिटिव्हच केलं. नाहीतर पॉझिटिव्ह नव्हतं. खरंच लोकं जे बोलतात ते खरंच आहे. संकटमोचक जे म्हणतात ते खरंच आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“कुणी तिकीट घेण्यासाठी स्तुती करेल, कुणी निधी घेण्यासाठी स्तुती करेल. पण मी खरंच मनापासून स्तुती केली. माझा एक स्वभाव आहे, स्तुती करायची नाही. खरंच ते संकटमोचक आहेत. आम्हाला आज चार दिवस वाढवून दिले. हे आमच्यासाठी खूप मोठे दिवस आहेत”, असं जरांगे म्हणाले.
“हे स्वयंसेवक सांभाळायचं, हे आंदोलन सांभाळायचं, त्यामध्ये स्वत:ची बॉडी सांभाळायची. त्याच आणखी तुम्ही दोन गोष्टी देवून बसलेत. सलाईन लावतोय आणि पाणीही पितोय. तुमचं एक इंजेक्शन असं आहे की, 15 दिवस भूक लागत नाही. माझं नुसतं ढोपर दुखत होतं. डॉक्टर म्हणाले, याला पालथं पाडा. इंजेक्शन टोचलं, म्हणाले, तीन मिनिटात गप्प होईल, अडीच मिनिटात गप्प झालो. मी खरं बोलतोय. अडीच मिनिटात माझी चमक चांगली झाली”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“तुम्ही खरंच संकटमोचक आहात. तुम्ही वेळ वाढवला. काय जादुई शक्ती आहे. मी सगळं व्यवस्थित करतो, व्यवस्थित सांगतो. पहिले आपल्या बैठका घेतो. मी इथे बसतो. तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही चांगला निर्णय घेतला. न होणारी घटना केली. सलाईन लावलं, पाणी पिलं. माझं आणखी आयुष्य वाढलं”, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांची स्तुती केली.