जालना | 2 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जावून मराठा आंदोलकांची भेट घेतली. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. पण या आंदोलनाला काल गालबोट लागलं. पोलिसांनी काल आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे अनेकजण जखमी झाले. यामध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश आहे. शरद पवार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
विशेष म्हणजे शरद पवार ज्यावेली आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आंदोलनस्थळी भाजप खासदार उदयनराजे भोसेल हे देखील आलेले होते. यावेळी शरद पवार यांनी उदयनराजे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. उदयनराजे हे भाजपचे खासदार आहेत. ते सत्तेत आहेत. असं असताना पवारांनी उदयनराजे समोर असताना त्यांच्यावर टीका करणं टाळलं. याउलट त्यांनी त्यांची स्तुती केली.
“राज्यातील मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय केला. त्यांच्याशी बोलणं झालं. एका ठराविक दिवसात प्रश्नांची तड लावण्याचं ठरलं. काही चर्चा झाली. आश्वासने दिली. दुर्देवाने जे काही ठरलं होतं त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मनोजने निर्णय घेतला आपण समाजासाठी पडेल ती किंमत द्यायची आणि त्यासाठी उपोषणाचा कार्यक्रम घेतला. आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मी काल सर्व माहिती घेतली”, असं शरद पवार आंदोलकांना म्हणाले.
“मनोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला पोलीस आले. त्यांनी बोलणी केली. एका बाजूला चर्चा सुरू केली आणि दुसऱ्या बाजूने पोलीस मोठ्या संख्येने आणल्या गेले. चर्चा चालू आहे. आणि चर्चा चालू असताना एका बाजूने बळाचा वापर करून काही लोकांवर लाठी हल्ला केला. बळाचा वापर केला. एवढंच नाही तर हवेत गोळीबार केला. त्याशिवाय अलिकडच्या काळात बंदुकीतून छर्रे वापरतात. त्या छऱ्यांचा मारा केला. मी रुग्णालयात गेलो. काही लोक असे होते त्यांच्या अंगावर छर्रे मारले गेले. छोट्या छोट्या गोळ्या मारल्या गेल्या”, असं पवार म्हणाले.
“प्रश्न समजून घेण्यासाठी लोकशाहीत अधिकार असतो. आंदोलनात कोणताही कायदा हातात घेतला नाही. कोणताही दंगा केला नाही. असं असताना पोलीस बळाचा वापर करणं योग्य नाही. त्याची आवश्यकता नव्हती. हे सर्व माहीत असतानाही बळाचा वापर केला गेला. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने शांततेने मागण्यासाठी कार्यक्रम सुरू होता त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय”, असं शरद पवार म्हणाले.
“आज संबंध देशात एक वेगळं चित्र आहे. देशात काही ठिकाणी, काही राज्यात सवलती दिल्या आहेत. तिथे सवलती दिल्या आहेत, त्यापेक्षा काही वेगळी मागणी नाही. तुमची जी मागणी आहे, त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. मागच्या सरकारने निर्णय घेतला. त्यानंतर काही लोकांनी कोर्टात जाऊन स्थगिती दिली. त्यामुळे हा निर्णय झाला नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“काही वैयक्तिक स्वार्थ नाही. हे उपोषण स्वत:च्या फायद्यासाठी नाही. हे उपोषण समाजाच्या तरुण पिढीचं भवितव्य घडवून आणण्यासाठी काही निर्णय घेतलं पाहिजे, त्यासाठी चार-पाच दिवसापासून पाण्याचा घोट घेतला नाही. समाजासाठी काही करत असेल तर त्यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे. शांततेने आंदोलनात सहभागी व्हा”, असं शरद पवार म्हणाले.
“या समाजाचे आदर्श स्थान सातारचे प्रतिनिधी उदयनराजे भोसले आले आहेत. उदयनराजे आले याचं समाधान आहे. ज्या ज्यावेळी असे प्रश्न येतात त्यावेळी आपण राजे आणि महाराजे आहोत. वारस आहोत हे विसरून ते येत असतात. मी त्यांचं अंतकरणापासून स्वागत करतो. आपण राजे आहोत याचा विचार न करता आपण समाजासाठी आहोत ही भूमिका घेतात. त्यांचं स्वागत करतो. तुम्ही जो संघर्ष करत आहात, तुमच्यापाठी आम्ही सर्व आहोत”, असं शरद पवार म्हणाले.