जालना | 2 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जालन्यात मराठा आंदोलकांची भेट घेतली. जालन्यात मराठा आंदोलकांवर भीषण लाठीचार्जची घटना काल घडली. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद बघायला मिळाले. शरद पवार यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर ते आज जालन्यात गेले. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. ते गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषस्थळीच काल पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर आज पवार त्यांच्या भेटीला गेले. शरद पवार यांच्या या जालना दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनादेखील विरोधाचा सामना करावा लागला.
जालन्यात लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. धुळे-सोलापूर मार्गावर टायर जाळण्यात आले होते. तसेच तीन बसची जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतरही आजही मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. याच आंदोलनाचा फटका शरद पवार यांनाही बसला. जालन्यात अंतरवली सराटे गावातील आंदोलकांची भेट घेतल्यानंतर परतत असताना त्यांना एका ठिकाणी तरुणांच्या विरोधकांचा सामना करावा लागला. त्यांचा ताफा रस्त्याने जात असताना काही कार्यकर्त्यांनी निदर्शने दिले. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ताफ्याचा मार्ग बदलवण्यात आला.
शरद पवार यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोकांना भेटण्यापूर्वी ते अंबड जिल्हा रुग्णालयात गेले. तिथे त्यांनी जखमी कार्यकर्त्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्याला कशाप्रकारे मारहाण करण्यात आली त्याविषयी सांगितली. शरद पवार यांनी जखमी कार्यकर्ते आणि महिलांची देखील विचारपूस केली. यावेळी जखमी लहान मुलगादेखील त्यांनी बघितला. पोलिसांशी चर्चा झाली होती. शांततेत सर्व सुरु होतं. पण अचानक एक फोन आला आणि लाठीचार्ज करण्यात आला, असं जखमी आंदोलकांनी शरद पवार यांना सांगितलं.
शरद पवार यांच्या जालना दौऱ्यादरम्यान एक अनोखी घटना घडली. शरद पवार अंतरवाली सराटी गावात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले तेव्हा त्याठिकाणी अनोखा प्रकार पाहायला मिळाला. शरद पवार तिथे पोहोचण्याआधी भाजप खासदार उदयनराजे भोसले आंदोलनस्थळी पोहोचलेले बघायला मिळाले. ते मंचावर जरांगे पाटील यांच्याजवळ बसलेले होते. त्यानंतर पवार तिथे आले. शरद पवार यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी उदयनराजे यांचं कौतुक केलं. तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला.