ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. पण शासनाकडून कुणीही लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी आले नाही, असा आरोप केला जातोय. शासनाने उपोषणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप करत ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जालन्यात रस्ता रोको आंदोलन सुरु केलं. जालन्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. आंदोलकांनी रस्ता रोखून धरला. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाचप्रकारे चालूच राहील, असा इशारा या आंदोलकांनी दिला. या आंदोलकांच्या हातात पिवळ्या रंगाचे झेंडे होते. “एक पर्व, ओबीसी सर्व”, अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली.
“आमचे दोन संघर्षयोद्धा आज उपोषणाला बसले आहेत. आज सहा दिवस झाले, त्यांनी अन्नपाणी घेतलेलं नाही. परिस्थितीत इतकी बिकट झाली. त्यांना बोलता येत नाही आणि आज त्यांचा श्वास थांबला होता. आमच्या संघर्षयोद्ध्याला धक्का लागला तर आम्ही आख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया एका आंदोलकाने दिली.
आणखी एका आंदोलकाने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मागील सहा दिवसांपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे सर यांचं उपोषण सुरु आहे. पण शासनाकडून कोणत्याही प्रकारची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. त्यांची प्रकृती आज खालावली आहे. कधीही काही कमी-जास्त होऊ शकतं. तरीही शासन लक्ष देत नाही. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन रस्ता रोको केलेला आहे. जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत ठिकठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन आम्ही करत राहू. शासनाने आमची काळजी घेतली पाहिजे की लोकांच्या भावना दुखवणार नाहीत”, अशी भूमिका दुसऱ्या ओबीसी आंदोलकाने मांडली.
घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी काळजी घेतली गेली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून मध्यस्थी करण्याता प्रयत्न केला गेला. पोलिसांनी आता महामार्गापासून आंदोलकांना बाजूला केल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी आरोपी जास्त आक्रमक होताना दिसले. आंदोलकांनी धुळे-सोलापूर मार्गावर टायर पेटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी परस्थिती नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलिसांकडून आंदोलकांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय. घटनास्थळी तहसीलदार दाखल होत असल्याची माहिती समोर आली.