जालना | 4 सप्टेंबर 2023 : जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या उपोषणस्थळी पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज झाला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यामुळे वातावरण तापलं आहे. राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. तसेच या नेत्यांनी जखमींची देखील भेट घेतलीय. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना एक महत्त्वाचा निरोप घेऊन पाठवलं.
अर्जुन खोतकरांनी यावेळी चर्चेसाठी दार खुलं करा, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांना केलं. यावेळी जरांगे यांनी आपण चर्चेला तयार आहे, असं सांगितलं. यावेळी अर्जुन खोतकर यांनी काही कागदपत्रे दाखवत मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्रे दिली जातील, असं लिखित आश्वासन दिलं. यावेळी संबंधित कागदपत्रांमध्ये मनोज जरांगे यांनी दुरुस्ती सांगितली. त्यानुसार अर्जुन खोतकर यांनी दुरुस्ती देखील केली.
यावेळी रासप नेते महादेव जानकर हे देखील आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे यांनी उपोषण सोडणार नाही, असं सांगितलं. महादेव जानकर यांनी आंदोलकांना मी तुमच्यासोबत आहोत, असं आश्वासन दिलं. पण स्वत:चा जीव धोक्यात टाकू नका. मराठा समाजाने सार्थी संस्था सुरु केली तेव्हा त्याचा डायरेक्टर मी होतो. आपल्या बांधवांच्या हितासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं महादेव जानकर म्हणाले.
मराठा उपसमितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीची माहिती अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपसमितीची लवकरच पत्रकार परिषद पार पडेल आणि मोठी घोषणा केली जाईल, अशी माहिती अर्जुन खोतकरांनी यावेळी मनोज जरांगे यांना दिली. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जोपर्यंत शासनाचा जीआर निघत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी जरांगे यांची भूमिका आहे. त्यामुळे आता अर्जुन खोतकर यांच्या भेटीनंतर जरांगे उपोषण सोडणार का? हे पाहणं महत्त्वाचंल ठरणार आहे.