शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये प्रचारसभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी जनतेकडे न्यायाच्या मागणी केली. आपल्याला सुप्रीम कोर्टाकडून अद्याप न्याय मिळाला नाही. ज्यांच्यासमोर सुनावणी झाली ते सरन्यायाधीश आज निवृत्त झाले. पण न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता आपण जनतेच्या न्यायालयापुढे जात असल्याचं ते म्हणाले. “आम्ही जनतेत न्याय मागण्यासाठी आलेलो आहेत. सरन्यायाधीश आज निवृत्त झाले आहेत. निकाल कधी मिळणार आहे की नाही? लोकशाही अखेरची घटका मोजत आहे. तिला वाचवणारं कुणी आहे की नाही? सगळीकडे फक्त तारीख पे तारीखच कार्यक्रम चालू आहे. आम्हाला न्याय मिळतो की नाही? मधल्या काळामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. ही सगळी थट्टा तुम्ही कशासाठी करत आहात?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी तुमच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय का मिळत नाही? जे संविधनाप्रमाणे आहे ते मिळालं पाहिजे. 3 सरन्यायाधीश झाले तरीदेखील लोकशाहीला अजून न्याय नाही मिळत नाही. आमचं सगळ्यात महत्त्वाचं न्यायालय म्हणजे जनता आहे आणि जनता न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. माझा पक्ष आणि चिन्ह पळवलं. भाडखाऊ पेक्षा जास्त शब्द असेल तर तो वापरा. जर कोणी माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणत असेल तर तो बेअकली आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला.
“पक्ष चोरला, चिन्हं चोरलं. भाडखाउ पेक्षा जास्त वेगळा शब्द वापरायला पाहिजे. मिंध्याना स्वतःच्या बापाचं नाव वापरायला लाज वाटते. मी काढलेला फोटो तुम्ही चोरला. हमखास पराभवाची गॅरंटी म्हणजे यांची गॅरंटी. औरंगाबादचं संभाजीनगर कोणी केलं? आपण केले. हे गद्दार ढोकळा खायला पळाले होते. विमानतळाचे नाव संभाजीनगर का नाही केलं? माझ्यावर टीका करण्याआधी तुमच्या बुडाखाली काय काय पेंडिंग आहे ते आधी बघा”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
“मी फक्त परतूरच नाही तर संपूर्ण जालना जिल्हा जिंकण्यासाठी आलो आहे. समोरच्याची विकेट काढण्यासाठी आलेलो आहे. बऱ्याच दिवसानंतर आज परतूरमध्ये आलो आहे. लोकसभेच्यावेळी मला जालनामध्ये यायला शक्य झालं नाही. तरीही बऱ्याच दिवसानंतर तुम्ही जालण्याचा खासदार निवडून दिलं. संपूर्ण महाराष्ट्रात आता मशाल पेटलेली आहे. हे खोके सरकार आम्ही 20 तारखेला जाळून भस्म करणार आहोत. जालन्यात आपला खासदार झाला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.