James lane Controversy: बाबासाहेबांशी कधीही एका शब्दाने सुद्धा बोललो नाही, पुरंदरे वादावर जेम्स लेनचा खुलासा

| Updated on: Apr 17, 2022 | 2:01 PM

शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, या पुस्तकाच्या लिखाणासाठी आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मदत घेतली का, असा प्रश्न या पुस्तकाचे लेखक जेम्स लेन यांना इंडिया टुडेच्या वतीने विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जेम्स लेन म्हणाले की, मला याबाबत कोणीही माहिती दिली नाही. माझे पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे.

James lane Controversy: बाबासाहेबांशी कधीही एका शब्दाने सुद्धा बोललो नाही, पुरंदरे वादावर जेम्स लेनचा खुलासा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन.
Follow us on

मुंबईः शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया (Shivaji: Hindu King in Islamic India) या पुस्तकाच्या लिखाणासाठी आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी एका शब्दानेही चर्चा केली नव्हती, असा मोठा खुलासा या पुस्तकाचे वादग्रस्त लेखक जेम्स लेन यांनी केला आहे. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली. त्यात महाराष्ट्रात सुरू झालेल्या वादावर लेन यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे जातीपातीचे राजकारण सुरू झाले. त्यातही जेम्स लेन प्रकरणावरून बाबासाहेब पुरंदरेंसारख्यांना सॉफ्ट टार्गेट करण्यात आले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले होते की, जेम्स लेनचे गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केले, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचे लेन यांनी म्हटले. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचे दुःख नाही, तर अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्यांनी राज यांचा समाचार घेतला होता. मात्र, स्वतः लेन यांनी पवारांनी केलेले सारे आरोप फेटाळले आहेत. जाणून घेऊन लेन काय म्हणतात ते?

तुम्ही चुकीचा अर्थ काढला…

शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, या पुस्तकाच्या लिखाणासाठी आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मदत घेतली का, असा प्रश्न या पुस्तकाचे लेखक जेम्स लेन यांना इंडिया टुडेच्या वतीने विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जेम्स लेन म्हणाले की, मला याबाबत कोणीही माहिती दिली नाही. माझे पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे. या कथा सांगत असलेल्या लोकांनी काय Narrative सेट करून ठेवले आहे, त्याबद्दल आहे. काही लोक रामदासांना शिवरायांचे गुरू मानतात, तर काही तुकाराम महाराजांना. यातले काय खरे आहे, त्यात मला रस नाही. मात्र, एक गट पहिल्या Narrative च्या बाजूने आहे तर दुसरा दुसऱ्या narrative च्या बाजूने. असं का? माझ्या पुस्तकात मी कुठलेही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केला नाही. मी शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. मी पुन्हा सांगेन की, मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही.

कधीही बाबासाहेबांशी बोललो नाही…

जेम्स लेन पुढे म्हणतो की, मी कधीही बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही बोललेलो नाही. छत्रपती शिवरायांबद्दलचे अवमानकारक शब्द तुम्ही मागे का घेतले, असा प्रश्न विचारला. त्यावर लेन म्हणाले की, युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही. त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागला. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज महान नायक होते. त्यांचे चरित्र हा आज गांभीर्यपूर्वक अभ्यास करण्याचा विषय राहिलेला नाही याचे दुःख वाटते. राजकीय वाद निर्माण करण्यासाठी त्यांच्या चरित्राचा दुरुपयोग होतोय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पुरंदरेंवर टीका का?

बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांच्या कार्याचा प्रसार केला. याकडे तुम्ही कसे बघता, या प्रश्नावर इंडिया टुडेला उत्तर देताना लेन म्हणाले की, पुरंदरे यांनी एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य लोकांसमोर मांडले. त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले. त्यांच्यावर आज होत असलेली टीका ही अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात वाचला गेलेल्या इतिहासाचा परिपाक आहे. शिवाजी महाराजांचे वंशज खरेखुरे क्षत्रीय नव्हते, असे त्या काळातील काही ब्राह्मणांना वाटत असे. त्यातून निर्माण झालेल्या रोषाचा परिणाम ब्राह्मण आणि मराठा यांच्यात इतिहासाच्या आकलनावरून झालेल्या वादात पाहायला मिळतो, असा दावा त्यांनी केला.
इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!