मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यामुळं मराठवाड्यातल्या 48 जागांवर थेट परिणाम होणार हे स्पष्ट झालंय. मात्र, कोणाच्या विरोधात उमेदवार देणार, यावरुन पत्ते उघड करण्यास जरांगे तयार नाहीत. जरांगे पाटलांनी उमेदवार देण्याची घोषणा करताना 2-3 मुद्दे स्पष्ट केलेत. कोणत्या मतदारसंघात मराठा उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथं जरांगे उमेदवार देणार. एससी, एसटी मतदारसंघात उमेदवार देणार नाहीत, विचारधारा मान्य असल्याचं लिहून देणाऱ्यांना मदत करणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महायुतीला फटका बसला. जरांगेंनी उमेदवार न दिल्यानं ती मतं महाविकास आघाडीकडे गेली आणि छत्रपती संभाजीनगरची शिंदेंची जागा भुमरेंच्या रुपानं निवडून आली. त्यामुळं भाजपच्या विरोधातच जरांगे उमेदवार देणार की शिंदेंच्याही विरोधात उमेदवार उभे करणार हाही प्रश्न आहे. यावर जरांगे उघडपणे बोलण्यास तयार नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षणाची मागणी जरांगेंची होती. मात्र तसं करण्यासाठी फडणवीसांनीच शिंदेंना रोखलं असा आरोप जरांगेंचा आहे. त्यामुळं उमेदवार देण्याची घोषणा केल्यावरही जरांगे शिंदेंऐवजी फडणवीसांवरच आक्रमक आहेत.
मराठवाड्यात विधानसभेच्या 48 जागा आहेत. 2019 मध्ये मराठवाड्यात भाजपचे 17 आमदार, शिवसेनेचे 12 आमदार निवडून आले होते त्यापैकी शिंदेंकडे 9 आणि ठाकरेंकडे 3 आमदार आले..काँग्रेसचे 8 आमदार तर राष्ट्रवादीचेही 8 आमदार आले. त्यापैकी अजित पवारांकडे 6 आणि शरद पवारांकडे 2 आमदार आले आणि 3 इतर आहेत.
29 तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या शेवटच्या दिवसाच्या 3 दिवसांआधी जरांगे उमेदवारांची घोषणा करणार आहेत. त्यामुळं जरांगेंची पाडापाडी कुठल्या दिशेनं असेल हे दिसेल.
विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यात आता जरांगे पाटील यांनी ही उमेदवार देणार असल्याची घोषणा केल्याने तिकडे सगळ्याचं पक्षांची चिंता वाढली आहे. याचा सर्वात जास्त फटका महायुतीतील भाजपला बसू शकतो. कारण जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जरांगे कुठे कुठे उमेदवार देतात हे देखील पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्रात २० नोव्हेबंर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निकालानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर किती प्रभावी ठरला हे देखील दिसून येणार आहे.