निवडणूक लढणार की पाडापाडी करणार, जरांगे पाटील उद्या घेणार निर्णय

| Updated on: Oct 19, 2024 | 9:15 PM

मनोज जरांगे पाटील हे उद्या अंतरवाली सराटी या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. मराठा आरक्षणावरुन सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण हे शक्य नसल्याचं सरकारने म्हटले आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात मतदान करायला सांगायचं की थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं याचा निर्णय उद्या होणार आहे.

निवडणूक लढणार की पाडापाडी करणार, जरांगे पाटील उद्या घेणार निर्णय
Follow us on

Manoj Jarange : निवडणूक लढायची की नाही याचा फैसला उद्या जरांगे पाटील घेणार आहेत. उद्या अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक आहे. त्या बैठकीआधी आज तज्ज्ञांची बैठकही झाली. उमेदवार दिले किंवा पाडापाडीचा निर्णय झाला तरी, जरांगे फॅक्टर निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. पुढच्या काही तासांत जरांगे पाटील आपला निर्णय घोषित करणार आहेत. निवडणूक लढणार की नाही, की पाडापाडी करणार याचा निर्णय घेण्याआधी अंतरवाली सराटीत जरांगेंनी काही अभ्यासकांचीही बैठक बोलावली होती. या बैठकीत निवडणुकांचा अनुभव असलेले निवडणूक प्रक्रिया तज्ञ, राजकीय अभ्यासक, वकील, निवृत्त अधिकारी, आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांची बैठक झाली. जरांगे पाटलांनी मराठा समाजाची बैठक बोलावलेली आहे. ज्यात निवडणुकीसंदर्भात जरांगे निर्णय घेणार आहेत.

निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाच तर किती जागांवर जरांगे पाटील उमेदवार देणार ?. स्वत: निवडणूक लढणार का ?, स्वतंत्रच लढणार की कोणाला पाठींबा देणार ? हे जरांगे स्पष्ट करणार आहेत. आणि जर निवडणूक न लढता पाडीपाडीचा निर्णय झाला, तर कशाप्रकारे पाडापाडी करणार ?..फक्त महायुतीचेचे उमेदवार पाडणार की महाविकास आघाडीचेही उमेदवार पाडणार ?, कोणत्या उमेदवाराला पाठींबा देऊन पाडापाडी करणार का ? हे जरांगे सांगणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी उमेदवार न दिल्यानं थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. लोकसभेत मराठवाड्यातील 8 जागांपैकी 7 जागांवर महायुतीला फटका बसला आणि महाविकास आघाडीचा विजय झाला. विधानसभेचा मराठवाड्यात विधानसभेच्या 48 जागा आहेत. त्यामुळं जरांगेंनी लढण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीला फटका बसण्याची चिन्हं आहेत. तर जरांगे पाटील आमच्या सोबत येतील असा विश्वास महाशक्ती परिवर्तन आघाडीच्या राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी जरांगेंची होती. तीच सरसकट आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यानं जरांगेंनी आता सरकारच्या विरोधात लढण्याचा इशारा दिलाय. अर्थात सरकारमधून जरांगेंच्या निशाण्यावर अधिक वेळ फडणवीसच आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्वाचा असेल. कारण उमेदवार दिले किंवा पाडापाडीचा निर्णय घेतला. तरी महायुती आणि महाविकास आघाडी संदर्भात फायदा नुकसान होणारच आहे..