मुंबईः महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची आज बुधवारी पहाटेपासून ईडीने (ED) चौकशी सुरू केल्यामुळे एकच खळबळ उडालीय. मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटेच धडकले. त्यांनी मलिकांना आपल्या कार्यालयात नेत सकाळी पावणेआठच्या सुमारास चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी म्हणजे नवाब मलिकांनी जी अनेक प्रकरणं बाहेर काढली आहेत, त्याचीच ही प्रतिक्रिया असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले पाटील?
महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांच्या चौकशीवरून जयंत पाटील म्हणाले की, हा आणखी एका सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस, सूचना न देता, राज्यातला एका मंत्र्याला घेऊन जाणं, ही सगळ्याच गोष्टींची पायमल्ली आहे. अलीकडच्या काळात नवाब मलिकांनी जी प्रकरणं बाहेर काढली, त्याचीच ही प्रतिक्रिया असल्याचं सध्यातरी दिसतंय, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या. सुळे म्हणाल्या की, आमच्यावर छत्रपती शिवाजी महारांजांचे संस्कार आहेत. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. खोटेनाटे आरोप करून पळून जातात, त्याची आम्हाला सवय आहे.
सु्प्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, मला या प्रकरणाचे आश्चर्य वाटत नाही. आम्हाला सातत्याने धमकी देतायेत. जर नोटीस पाठवली असती, तर आम्ही नाष्टा दिला असता. केंद्र सरकार त्यांची यंत्रणा वापरतेय. फक्त विरोधकांनाच नोटीस येतीय. भाजपचे नेते ईडीचे प्रवक्ते आहेत, असं दिसतंय. कोणाला अटक होणार, कोणावर कारवाई होणार, हे फक्त एकाच पक्षाच्या लोकांना कसं कळतं आम्ही कामात व्यस्त आहोत. बाकी सरकार पडणार, या गोष्टीत माझा कमी अभ्यास असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी एका सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस, सूचना न देता, राज्यातला एका मंत्र्याला घेऊन जाणं, ही सगळ्याच गोष्टींची पायमल्ली आहे.
– जंयत पाटील, मंत्री
इतर बातम्याः
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात