Santosh Deshmukh murde case Beed protest: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर घाणाघाती टीका केली. बीड जिल्ह्याचे नुकसान या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्याने आणि पोलिसांनी केले, असा आरोप आव्हाड यांनी मुंडे यांचे नाव न घेता केले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, संतोष देशमुख हा फक्त चेहरा झाला. त्यांची हत्या करणाऱ्यास वाल्मिकी नका म्हणू तो वाल्या आहे. आज संतोष देशमुख या एका माणसासाठी लढत आहेत. कारण तो स्वत:च्या जातीसाठी गेला नव्हता. एका दलित वाचमानला मारहाण झाली. त्यामुळे संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले होते. या बीड जिल्ह्याचे सत्यनाश कोणी केला असले तर पोलिसांनी आणि बीडच्या पालकमंत्र्यानी केला. त्याच दिवशी अॅट्रसिटी केस दाखल झाली असती तर संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले नसते आणि हत्या झालीच नसती.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, संतोष बांगर यांच्यावर वाल्मिक याने अनेक केसेस टाकल्या. त्यामुळे सध्या अशी परिस्थिती आहे की संतोष बांगर यांना घरच नाही. कोर्टच त्यांचे घर झाले आहे. त्यांचा वेळ कोर्टातच जात आहे. सुरेश धस यांनी जी नावे घेतली, ज्यांचे खून झाले, ते वंजारी होते. मग मारणारे वंजारीच होते. बीडमध्ये एक ठिणगी पडली आहे. त्याची आग महाराष्ट्रात लागल्याशिवाय राहणार नाही.
राज्यातील संवेदना जिवंत आहे की नाही, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आमच्या ताईचे कुंकू पुसले गेले. त्यांचे कुंकू कुणी आता परत आणून देणार आहे का? त्यांच्या भविष्याची कोणी चिंता केली आहे का? तरीही राजकारण सुरू आहे. आज मला एकी दिसतो, माणुसकीची दिसत आहे, ही एकी अशीच ठेवा. हा झंझावात आहे. असा कायम ठेवा, असे आव्हाड म्हणाले.