पुणे : शौर्य दिनाला भीमा कोरेगावला सरकारमधील कुणीच आलं नाही, असं पिपल्स रिपब्लिकन पार्टी नेते जोगेंद्र कवाडे म्हणाले आहेत. तसेच शिंदे गटासोबतच्या युतीबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.तसेच लवकरच याबाबत निर्णय घेऊन मुंबईला जाण्याची घोषणा करु, अशी प्रतिक्रिया जोगेंद्र कवाडे यांनी दिली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं मानलं जात असतानाच दलित समाजातील मोठे नेते जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये युतीची चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. पण असं असताना जोगेंद्र कवाडे यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिलीय.
“राजकारणात भेटीगाठी होत राहतात. मी काल ठाण्यात होतो. याबाबत मुख्यमंत्र्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी मला चहापाण्यासाठी आमंत्रित केलं. आम्हीही गेलो. आमच्यात चर्चा झाली. पण अजून काही निश्चित ठरलेलं नाही”, असं जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं.
“जेव्हा आमची प्रत्यक्ष मुंबईत बैठक होईल तेव्हा आघाडी करण्याबाबतची चर्चा होईल. अद्याप तरी याबाबत चर्चा झालेली नाही”, असं कवाडे यांनी स्पष्ट केलं.
“राजकीय फायदा-तोट्याचा विचार करण्याऐवजी हे सरकार विकासामागे धावत आहे. मुख्यमंत्री स्थानिक पातळीवर नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात आघाडी झाली तर निश्चितच राजकारणात याचा फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया योगेंद्र कवाडे यांनी दिली.