‘मनोज जरांगे पाटील हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण महाराजांची अतिशय खोचक टीका

| Updated on: Nov 18, 2024 | 6:56 PM

स्वयंघोषित महाराज कालीचरण यांच्याकडून मराठा मोर्चाची खिल्ली उडवण्यात आली आहे. लाखो मुंबईमध्ये गेले, ते खातील काय, टॉयलेटला जातील कुठे हे टेन्शन होतं का? असं कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील हिंदुत्व तोडणारा राक्षस, कालीचरण महाराजांची अतिशय खोचक टीका
Follow us on

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर पहिल्यांदाच स्वयंघोषित महाराज कालीचरण यांनी अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. कालीचरण महाराजांनी टीका करताना मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्यक्ष नाव घेतलेलं नाही. पण त्यांचा पूर्ण रोख मनोज जरांगे यांच्याच दिशेला होता. त्यांनी मनोज जरांगे यांचा उल्लेख थेट राक्षस असा केला. त्यांच्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना आता कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याने नवं वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे स्वयंघोषित महाराज कालीचरण यांच्याकडून मराठा मोर्चाची खिल्ली उडवण्यात आली आहे. लाखो मुंबईमध्ये गेले, ते खातील काय, टॉयलेटला जातील कुठे हे टेन्शन होतं का? असं कालीचरण महाराज म्हणाले आहेत. थडग्यावर चादर चढवणारा त्यांचा नेता हा हिंदुत्व तोडणारा राक्षस, असा घणाघात कालीचरण महाराज यांनी केला. कालीचरण महाराजांनी नाव न घेता मनोज जरांगे यांचा उल्लेख राक्षस असा केला आहे.

कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले होते?

“आता एक आंदोलन सुरु झालं होतं ते तुम्हाला माहिती आहे का, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडायचं. अशी हवा होती त्या आंदोलनाची…, अशी हवा…, लाखो लोकं मुंबईत. टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोकं जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मला टेन्शन आलं की, त्यांनी आता जावं कुठे?”, असं कालीचरण महाराज म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“कुठला त्यांचा नेता थडग्यावर चादर चढवेल. आला रे चादरवाला आला रे आला. हे जाती-जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस!”, असा घणाघात कालीचरण महाराजांनी केला. त्यांच्या या टीकेवर आता मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

कालीचरण महाराजांची नेमकी टीका कशावर?

मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी मोठं आंदोलन केलं होतं. मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह त्यांच्या जालना येथील अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला आले होते. जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले होते. त्यासाठी ते नवी मुंबईत वाशीपर्यंत पोहोचले होते. जरांगेंची रॅली मुंबईत पोहोचली तर वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो याचा विचार करत राज्य सरकारने त्यांना तिथेच स्थानबद्ध करत मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनाच्या आधारावर माघारी परतले होते. याच आंदोलनावर कालीचरण महाराजांनी टीका केली आहे.