कल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला हा पोलिसांच्या ताब्यात आला आहे. अखिलेश शुक्ला हा बेपत्ता होता. अखेर त्याने सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट करत स्वत:ची भूमिका मांडली आहे. त्याने तो व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर खडकपाडा पोलिसांकडे स्वत:चं आत्मसमर्पण केल्याची माहिती आता समोर येत आहे. अखिलेश शुक्ला याने आत्मसमर्पणावेळी स्वत: चा व्हिडीओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील वाद हा शेजारधर्माशी संबंधित आहे, पण त्याला भाषेचा मुद्दा बनवण्यात आला, असा दावा अखिलेश शुक्ला याने केला आहे.
“दोन दिवसांपासून ज्या प्रकरणाची चर्चा सुरु आहे त्याबाबत मी काही महत्त्वाच्या बाबी सांगणार आहे. एका वर्षाआधी मी माझं घरचं इंटेरियर केलं आणि इंटेरियरमध्ये मी चप्पल-बूट ठेवण्याचा रॅक हा डाव्या बाजूहून उजव्या बाजूला केला. त्यानंतर देशमुख कुटुंब ज्यांचा प्लॅट क्रमांक 404 आणि कलकुट्टे कुटुंब ज्यांचा फ्लॅट क्रमांक 403 आहे, या दोघांनी खूप आक्षेप घेऊन वाद घातला. ते आम्हाला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होते की, हा रॅक तुम्ही इकडे का केला आहे म्हणून. तुम्ही तो रॅक तिकडेच लावा नाहीतर आम्ही त्याला तोडून फेकून देणार. ही लोकं मला आणि माझी पत्नीला एक वर्षापासून खूप त्रास देत होते. दररोज शिवीगाळ करणे, उलटसुलट बोलणे सुरु होते. माझी पत्नी दररोज मला ऑफिसमधून आल्यानंतर सांगत होती. तरीही मी या मुद्दावर बोललो नाही”, असं अखिलेश शुक्ला म्हणाला.
“दोन दिवसांपूर्वी माझी पत्नी दरवाजाच्या बाहेर धूप-बत्ती लावत होती. कलकट्टे काकूंनी येऊन सांगितलं की, तुम्ही रोज इथे अगरबत्ती लावतात, त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. ते तुम्ही आजपासून लाऊ नका. नाहीतर आम्ही तुम्हाला राहू देणार नाहीत. यानंतर त्यांनी माझ्या पत्नीला शिवीगाळ सुरु केली. मी तिथे येऊन प्रकरण शांत करायला लागतो. त्यानंतर तिथे देशमुख कुटुंबिय आले, धीरज देशमुख आणि त्यांचे लहान भाऊ यांनी माझ्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण सुरु केली. जोरजोराने दरवाज्याला आपटू लागले. त्यांनी माझ्या पत्नीचे केस खेचून कानशिलात लगावली. मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मलादेखील खूप शिवीगाळ केली”, असा दावा अखिलेश शुक्ला यांनी केला.
“यानंतर हे लोकं दुसऱ्या बाजूने व्हिडीओ बनवत ते व्हायरल करत आहेत. जो व्हिडीओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये केवळ भांडण दिसत आहे. त्यामागे नेमकं काय आहे ते दिसत नाही. ते मी या व्हिडीओद्वारे सांगितलं आहे. देशमुख कुटुंबिय आम्हाला एक वर्षापासून त्रास देत होते. या प्रकरणात माझ्या मराठी बांधवांनीच पुढे येऊन सहकार्य केलं. त्यांनीच मला वाचवलं. आमच्या पाच पिढ्या महाराष्ट्रात आहे. आम्हाला महाराष्ट्रात 100 वर्षे झाली. आम्ही मराठी आहोत की अमराठी आहोत हे आम्हाला कधीच माहिती नव्हतं. या लोकांनी विषय इतका ताणला, या लोकांनी माझ्या पत्नीला म्हटलं की, तुम्ही भैय्या लोकं तिथून आले आणि इथे घाण करतात, मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय आहोत आणि काय करणार. त्यानंतर मी आपल्या सर्व मराठी बांधवांनी सहकार्य केलं आणि आम्हाला वाचवलं”, असा देखील दावा शुक्ला याने केला.
“आम्हाला इथे शंभर वर्ष झाले आहेत. माझे 80 ते 90 टक्के मित्र हे मराठी भाषिक आहोत. मी सुद्धा मराठी आणि महाराष्ट्राचाच आहे. आम्ही एवढ्या वर्षांपासून इथे राहतोय आम्हाला कधीच तसं वाटलं नाही. आपल्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि सन्मानीय बाळासाहेब यांनी आपल्या सर्वांना हाच मेसेज दिलाय की, आपल्या राज्यातील महिला सुरक्षित आहेत. त्यांना कुणीही हात लाऊ शकत नाही. पण इथे उलट झालं आहे. देशमुख कुटुंबियांनी माझ्या पत्नीला मारहाण केली, खूप शिवीगाळ केली. या बचावासाठी आम्ही हे केलं. त्यानंतर या लोकांनी परप्रांतीय विषय पुढे केला. यामध्ये काही तथ्य नाही. या लोकांनी विषय डावलला आणि नको तो मुद्दा उभा केला आहे. म्हणून मी या व्हिडीओतून आपल्या सर्वांना विनंती करतो की, याचं खरं रुपही आपण बघावं. सर्व माझ्या मराठी बांधवांनी आम्हालाही सहकार्य करावं. जय हिंद जय महाराष्ट्र”, असं अखिलेश शुक्ला म्हणाला.