विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं पारडं जड राहतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राची निवडणूक ही देशावर प्रभाव टाकते असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच या निवडणुकीचं महत्त्व अधोरेखित केले आहे. महायुतीचे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध मविआचे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात हा थेट सामना होणार आहे. विधानसभा निवडणुकीतासाठी जागा वाटपांसाठी बैठका देखील सुरु आहेत. निवडणुकीची घोषणा होण्याआधीच जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुती आणि महाविकासआघाडीचा प्रयत्न असणार आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत यंदा कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीकडे देखील राज्याचं लक्ष असणार आहे. कारण येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्यामुळे हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. गणपत गायकवाड गेल्या १५ वर्षापासून या मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व करत आहेत. २००९ मध्ये पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत २४ हजार ४७६ मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर फाररिंग प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आले होते.
कल्याण पूर्वेत शिवसेना नगरसेवकांची संख्या जास्त असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी स्थानिक नेत्यांची 2019 मध्ये मागणी होती. पण ही जागा भाजपच्या वाटेला गेल्याने येथून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी मिळाली होती. गेल्या तीन टर्मपासून आमदार असलेल्या गणपत गायकवाड यांची या मतदारसंघावर मजबूत पकड आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. आपला माणूस आपला आमदार या स्लोगनमुळे ते अधिक चर्चेत राहिले. पण सध्या ते तुरुंगात असल्याने त्यांच्या जागी त्यांची पत्नी सुलभा गणपत गायकवाड या मतदारसंघात प्रचंड सक्रिय झाल्या असून त्यांनी कामाचा धडाका लावला होता. दररोज सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्या जनसंपर्क वाढवत आहेत. गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घेतली आहे. त्यातच त्यांनी मतदारसंघातील महिलांची विधानभेत महिला पाठवण्याची इच्छा असून ती इच्छा पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघ २००८ मध्ये निर्माण झाला होता. याआधी हा मतदारसंघ अंबरनाथ मतदारसंघात येत होता. कल्याण पूर्व मतदारसंघात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा काही भाग, अंबरनाथ तालुक्यातील काही गावं आणि उल्हासनगर महानगरपालिकेचा काही भाग येतो.
वर्ष | उमेदवार | पक्ष | एकूण मतं |
2019 | गणपत काळू गायकवाड | भाजप | ६०३३२ |
2014 | गणपत काळू गायकवाड | अपक्ष | ३६३५७ |
2009 | गणपत काळू गायकवाड | अपक्ष | ६०५९२ |
अनु क्रं | उमेदवार | पक्ष | एकूण मतं |
---|---|---|---|
१ | गणपत काळू गायकवाड | भाजप | ६०३३२ |
2 | धनंजय बाबुराव बोडारे ऊर्फ आबा | अपक्ष | ४८०७५ |
3 | प्रकाश बाळकृष्ण तरे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | १६७५७ |
४ | अश्विनी विनायक थोरात-धुमाळ | वंचित बहुजन आघाडी | १२८९९ |
५ | नोटा | NOTA | ३६९० |
६ | शैलेश राममूर्ती तिवारी | अपक्ष | २०१४ |
७ | मिलिंद चंद्रकांत बेलमकर | बसपा | १२८१ |
८ | ॲड उदय रसाळ | प्रहार जनशक्ती पार्टी | १००२ |
९ | बालाजी रामदास गायकवाड | अपक्ष | ८७४ |
१० | देवेंद्र जगदीश सिंग | अपक्ष | ७१६ |
११ | अक्षय मनोहर म्हात्रे | अपक्ष | ५७२ |
१२ | सोनी देवराम अहिरे | अपक्ष | ५३० |
१३ | नरेंद्र वामन मोरे | अपक्ष | ४७२ |
१४ | हरिश्चंद्र दत्तू पाटील | संघर्ष सेना | ४०० |
१५ | अभिजीत रवी त्रिभुवन | बहुजन मुक्ती पार्टी | ३२७ |
१६ | पटेल योगेश शिवराम | अपक्ष | ३२७ |
१७ | अपेक्षा अरुण दळवी | अपक्ष | २५५ |
१८ | नंदकुमार संभाजी लिमकर | अपक्ष | १८२ |
१९ | चिकणे सचिन सूर्यकांत | समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक | १८२ |
२० | साळवी हर्षल रवींद्र | अपक्ष | १७५ |
एकूण | १५१०६२ |
कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. कारण अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवानिमित्त कल्याण पूर्ण मतदारसंघात इच्छूक उमेदवारांची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळतेय. कल्याण पूर्ण विधानसभा निवडणूक हा आता भाजपचा गड मानला जातो. कारण या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे भाजपला ही उत्तर भारतीय मतदारांची मतं मिळू शकतात. गणपत गायकवाड किंवा त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना जर भाजपने तिकीट दिलं तर याचा थेट फायदा त्यांनाच होणार आहे.
कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन उमेदवार इच्छूक आहेत. यामध्ये पहिलं नाव येतं ते निलेश शिंदे यांचं आणि दुसरं नाव आहे महेश गायकवाड यांचं. दोन्ही ही विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. पण जर महायुतीत ही जागा भाजपला गेली तर मात्र या दोघांना पक्षाकडून ही येथे निवडणूक लढवता येणार नाही. निलेश शिंदे आणि महेश गायकवाड हे दोघेही माजी नगरसेवक आहेत.
निलेश शिंदे यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना १९३४६ मते मिळाली होती. गणपत गायकवाड यांना सर्वाधिक ३६३५७ मते मिळाली होती. शिवसेनेकडून गोपाळ लांडगे रिंगणात होते त्यांना ३५,६१२ मते मिळाली होती. तर विशाल पावशे यांना तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक २८००४ मते मिळाली होती. विशाल पावशे हे देखील यंदा इच्छूक उमेदवारांच्या यादीत आहेत. विशाल पावशे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती.
विशाल पावशे, निलेश शिंदे आणि महेश गायकवाड हे तिन्ही शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. जर महायुतीत ही जागा शिवसेनेकडे गेली तर मात्र या तिघांमध्ये कोणाला तिकीट मिळणार याकडे ही सर्वाचं लक्ष असेल. पण भाजप नेते ही जागा सोडण्यास तयार नाहीत. भाजपचे नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या जागेवर आधीच दावा केला आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते धनंजय बोडारे हे इच्छूक आहेत. त्यांनी २०१९ ची विधानसभा नवडणूक ही लढवली होती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते घेतली होती. धनंजय बोडारे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. सध्या ते ठाकरे गटात असल्याने जर ही जागा ठाकरे गटाकडे आली तर त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. कल्याण पूर्वेतून त्यांनी देखील मोर्चेबांधनी सुरु केली आहे. याआधी कल्याण पूर्व असो की पश्चिम आपण कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारच असं सचिन पोटे यांनी म्हटले होते. त्यामुळे जर ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली तरी या मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात.
१४२ कल्याण पूर्व हा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे हे निवडून आले आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात सर्वच प्रकारचे मतदार असल्याने येथे कोणत्याही एका समाजाच्या पाठिंब्यावर निवडून येणे शक्य नाही. कल्याण पूर्व मतदारसंघात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय या शिवाय राजस्थानी लोकांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे फक्त मराठी मतांवर डोळा ठेवून ही निवडणूक जिंकणे अशक्य आहे. आमदार गणपत गायकवाड निवडणुकीच्या आधी जर तुरुंगातून बाहेर आले तर मग भाजपचं पारडं आणखी जड होऊ शकतं. त्यांनी जरी निवडणूक नाही लढवली तरी त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड निवडणूक लढवतील याची दाट शक्यता आहे.