कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ २००८ च्या रचनेनंतर निर्माण झाला होता. या मतदारसंघातून सध्या मनसेचे राजू (प्रमोद) पाटील हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच परतफेड म्हणून महायुतीकडून कल्याण ग्रामीण मध्ये उमेदवार दिला जाणार नाही अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. शिवसेना शिंदे गटाने येथे उमेदवार दिलाय. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेकडून पुन्हा एकदा राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीये. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे मैदानात आहेत. तर ठाकरे गटाकडून सुभाष भोईर मैदानात आहेत. मतदारसंघात उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून छाननी प्रक्रियेत 14 उमेदवार वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर या मतदारसंघात एकूण 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारांना 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.