गेल्या काही दिवसांपासून कल्याणमधील महायुतीचा उमेदवार कोण असणार? ही चर्चा सुरु होती. भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु होता. शिवसेना कल्याण लोकसभेवरुन आपला दावा सोडण्यास तयार होत नव्हती. स्थानिक भाजप कार्यकर्ते विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना मदत करण्यास तयार नव्हते. यामुळे अजूनही कल्याण लोकसभेचा निर्णय जाहीर झाला नव्हता. अखेर कल्याणधील सस्पेन्स संपला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता कल्याणमध्ये दुहेरी लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे आणि महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीत संपूर्ण जागा वाटप अजूनही झालेले नाही. तिन्ही पक्षांत दिल्ली आणि मुंबईत चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानंतर कल्याण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि सिंधुदुर्गचा निर्णय अद्यापही जाहीर झालेले नाही. परंतु आता कल्याणमधील वादावर पडदा पडला आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असणार आहेत.
शुक्रवारी कल्याण पूर्वमध्ये भाजपची बैठक झाली होती. त्या बैठकीत श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. कल्याण लोकसभेसाठी दुसरा उमेदवार द्यावा, श्रीकांत शिंदे यांचा काम करणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेतला गेला होता. त्यानंतर आता शनिवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय जाहीर करत भाजप कार्यकर्त्यांना चपराक दिली आहे. महायुतीचा उमेदवार कल्याणमधून निवडून येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी करणे यात गैर काही नाही. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड मतांनी निवडून येईल. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत कल्याण पूर्व येथील भाजपाचेच नव्हे तर सगळेच भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, असे भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी सांगितले होते. आता देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय जाहीर केल्यामुळे भाजपमधील हा वाद मिटण्याची चिन्ह आहेत.