नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. शिवसेनेचं (Shiv Sena) नाव आणि चिन्हावर नेमका कुणाचा हक्क आहे, या विषयावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगात जवळपास दीड तास सुनावणी झाली. या सुनावणीनंतर दोन्ही गटाचे वकील जेव्हा बाहेर पडले तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोन्ही ज्येष्ठ वकिलांनी एकमेकांकडे बोटं दाखवली. अर्थात हे दोन्ही वकील वेगवेगळ्या वेळेत कोर्टातून बाहेर आले. आधी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) कोर्टाबाहेर आले. त्यांना सुनावणीबद्दल प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांना प्रश्न विचारा. ते काहीह करु शकतात, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर जेठमलानी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपण आज युक्तीवाद केलाच नाही. त्यामुळे कपिल सिब्बल यांना प्रतिक्रिया विचारा, असं म्हटलं. त्यामुळे या दोन्ही ज्येष्ठ वकिलांमध्ये ‘पहिले आप, पहिले आप’ असा सिलसिला बघायला मिळाला.
“होणार काय? कायद्यात फक्त युक्तिवाद होतो. महेश जेठमलानी मोठे वकील आहेत ते काहीही करु शकतात. त्यांना विचारा”, अशी प्रतिक्रिया कपिल सिब्बल यांनी दिली.
“मी काय प्रतिक्रिया देऊ. आम्ही सादर केलेल्या डॉक्युमेंट्सवर त्यांचा ऑब्जेक्शन असूच शकत नाही. मी जेव्हा बोललो तेव्हा मी पूर्ण प्रतिक्रिया दिली होती. कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया घ्या”, अशी प्रतिक्रिया महेश जेठमलानी यांनी दिली.
“आमचे वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीवेळी समोरच्या वकिलांनी ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या कशा चुकीच्या होत्या, ते स्पष्ट केलं. अगदी घटना पासून ते वेगवेगळ्या दावांना खोडण्यात आलं. दोन गटात संघटना विभागली गेली त्याचा बेस काय, याबाबत मुद्देसूदपणे माहिती मांडण्यात आली. त्याची नोंद आयोगाकडून घेतली गेली”, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.
“संघटनात्मक निवडणुकीच्या स्थितीबद्दल आज चर्चा झाली नाही. गेल्या सुनावणीवेळी त्यांनी जे मुद्दे मांडले ते कसे चुकीचे होते याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं. आपल्याच पक्षाची घटना घेऊन तुम्ही युक्तीवाद करता, एककीकडे घटना मान्य करायची आणि नंतर घटनाच नाही असा युक्तीवाद करायचा असा युक्तीवाद झाला”, अशी देखील माहिती अनिल देसाई यांनी दिली.
“देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाची ही सुनावणी होणार आहे. लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी ही सुनावणी महत्त्वाची आहे. त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्या गोष्टी समोर येत आहेत”, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.
“कपिल सिब्बल यांनी अजून दोन-अडीच तासांचा वेळ मागितला आहे. युक्तिवादासाठी वेळ लागेल, असं सांगितलं. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलली”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
“सुनावणी पूर्ण होऊ द्या. पक्षातून काही आमदार निघून गेले आहेत. पक्ष जागेवरतीच आहे. आम्ही सगळे पक्षात आहोत”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.