मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय. ह्या विस्तारात औरंगाबादचे राज्यसभा खासदार भागवत कराड यांना
राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. ते अर्थखात्याचे राज्यमंत्री आहेत. पण प्रीतम मुंडे यांना डावलून कराडांना
मंत्रीपद देणं म्हणजे वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न तसच पंकजा मुंडेंना धडा शिकवण्याचा प्रयत्न
असल्याचं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. विशेष म्हणजे प्रीतम मुंडेंच्या नावाची चर्चा
असताना कराडांना लागलेल्या लॉटरीवर मुंडे भगिनी अस्वस्थ, नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.
काय लिहिलंय सामनात?
सामनाचा आजचा अग्रलेख हा मोदी मंत्रिमंडळ विस्तारावर आहे. त्याच लेखात राज्यमंत्री झालेले भागवत
कराड आणि पंकजा मुंडेंबद्दल लिहिलं गेलंय. अग्रलेख म्हणतो- श्री भागवत कराड हे राज्यमंत्री झाले.
पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराडे हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले,
पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी
व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.
ही वंजारी समाजात फूट?
मुंडे भगिनी ह्या वंजारी समाजातून येतात. भागवत कराडही वंजारी समाजातूनच येतात. पंकजा मुंडेंचा
पराभव झाल्यानंतर वंजारी समाज भाजपावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. एवढच नाही तर
पंकजा मुंडे यांनीही पक्षावर उघड उघड नाराजी व्यक्त केली. त्याच पार्श्वभूमीवर पंकजांना विधान परिषदेवर
घेतलं जाईल अशी जोरदार चर्चा सुरु झाली. पण प्रत्यक्षात लातूरच्याच रमेश कराड, जे भाजपातून
राष्ट्रवादीत आणि पुन्हा भाजपात आले होते, त्यांना आमदार केलं गेलं. म्हणजे चर्चा पंकजांची आणि आमदारकी
रमेश कराड यांना. रमेश कराडही वंजारी समाजातून येतात.
चर्चा प्रीतम मुंडेंची, लॉटरी कराडांना
आताही मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची जशीही बातमी आली तशी प्रीतम मुंडे यांना मंत्री केलं जाईल अशी
चर्चा सुरु झाली. पण प्रत्यक्षात भाजपानं राज्यसभेवर घेतलेल्या भागवत कराडांना मंत्री केलं. भागवत
कराड हे औरंगाबादचे दोन वेळेस महापौर राहीले. गोपीनाथ मुंडेंनी त्यांना आमदारकीचं तिकिटही
दिलं होतं पण ते निवडूण नाही आले. त्यानंतर आता भाजपानं प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराडांना
केंद्रातल्या मंत्रीपदासाठी पसंती दिली. सामनातल्या अग्रलेखात यावरच बोट ठेवण्यात आलंय. प्रीतम मुंडेंऐवजी
भागवत कराडांना मंत्रिपद म्हणजे वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न तसच पंकजा मुंडें यांना
संपूर्ण खतम करण्याचा हा डाव असल्याचं सामनात म्हटलं गेलंय.
मुंडे भगिनींचं अभिनंदनाचं साधं ट्विट नाही
प्रीतम मुंडेंना डावलल्याबद्दल मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे. एक तर साध्या कार्यकर्त्याच्या
वाढदिवसालाही ट्विट करणारे नेते जेव्हा मंत्रिमंडळ विस्तारावर एक ट्विटही करत नाहीत. त्यावेळेस
नाराज आहेत हे सांगण्याची गरजच नाही. ती नाराजी दिसतेच. मंत्रिमंडळ विस्ताराला आता दोन दिवस
उलटून गेलेत पण ना पंकजा मुंडेंनी, ना प्रीतम मुंडेंनी भागवत कराडांचं अभिनंदन करणारं ट्विट केलंय.
कराडांचं सोडा, त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर एकही ट्विट केलेलं नाही. उलट प्रीतम मुंडे दिल्लीत गेलेल्या
नाहीत याचं त्यांनी तत्परतेनं ट्विट केलं. अजून तरी तेच त्यांचं शेवटचं ट्विट आहे.